| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २९ ऑगस्ट २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण व पाणलोट क्षेत्रात गेले पाच-सहा दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचांगा, तुळशी, कुंभी, कासारी, कडवी, भोगावती, दूधगंगा अशा सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी राधानगरी व दूधगंगा यांच्यासह सर्व धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात 95 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा असल्याने यापुढे अधिक काळजी घेण्याचे गरज आहे. धरण तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी ढगफुटीचा आहे इशारा देण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
सध्या हिप्परगी बंधाऱ्याची आजची पाणी पातळी 523. 35 मीटर आहे, तर अलमट्टी धरणाची पाणी पातळी 519. 31 मीटर आहे. या पार्श्वभूमीवर हवामान उसाचा अंदाज लक्षात घेता 15 सप्टेंबर पर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 मीटर अशी स्थिर ठेवण्याची आवश्यकता असल्याने धरणातून योग्य तो विसर्ग होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच कर्नाटक प्रशासन, बेळगावचे जिल्हाधिकारी, तसेच कर्नाटक जलसंपदा विभागाशी तातडीने संपर्क आणि समन्वय साधण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व यंत्रणांची त्वरित संपर्क साधून परिणामी अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्युसेस विसर्ग करण्याचा आग्रह धरावा अशी मागणी , कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
गत अनुभव पाहता, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने घेतलेली भूमिका किती योग्य होती, हे जनतेने अनुभवलेले आहे. आणि म्हणूनच केवळ प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून आवश्यकता नाही, तर शासन पातळीवरही दबाव आणणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून, कर्नाटक शासनावरही दबाव आणला गेला पाहिजे. तरच कोल्हापूर आणि पाठोपाठ सांगली जिल्ह्याला महापुराच्या धोक्यापासून वाचवता येऊ शकेल.