Sangli Samachar

The Janshakti News

कथा नाटकातील पात्रांची व त्यांच्या भूमिकांची ! (✒️राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १४ ऑगस्ट २०२४
एका नाटकाच्या निर्मात्याने आपल्या नाटकातील कांही नवशिक्या व कांही जुन्या अभिनेते अभिनेत्रींना सांगितले, 
“तुम्हाला दिलेली भूमिका तुम्ही नीटपणे पार पाडत नाही. त्यामुळे तुम्ही  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. इतकेच नाही तर आपली भूमिका योग्य रितीने पार न पाडण्याचे तुमचे कृत्य माझ्या निर्मितीस बाधा आणत आहे. त्यामुळे अंतर्यामी मला खूप वेदना व दुःख होत आहे. या नाटकात तुम्हाला मी दिलेली भूमिका समजाऊन न घेता तुमच्या मनाप्रमाणे, विचाराप्रमाणे व लहरीप्रमाणे करण्याची तुमची कृती अशीच पूढे चालू राहिली तर, नाईलाजाने मला हे नाटक बंद करण्याचा विचार करावा लागेल. आणि माझ्या या कृतीला तुम्ही व फक्त तुम्हीच पूर्णपणे जबाबदार असाल याची तुम्ही नोंद घ्या. माझ्याकडून तुम्हाला ही शेवटची सूचना आहे. हे नाटक पुढे चालू ठेवायचे कि बंद पाडायचे याचा निर्णय तुमच्या भूमिकेवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन काय करायचे ते ठरवा.”   

एवढे बोलून नाटकाचा निर्माता तेथून निघून जाणार, इतक्यात कांही अभिनेते अभिनेत्रींनी निर्मात्याला कांही क्षण थांबण्याची विनंती केली. त्यांनी आपापसात विचार-विनीमय, चर्चा केली आणि त्यांच्यातील सर्वात सूज्ञ व विचारवंत ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे, त्या सर्वांनी नाटकाच्या निर्मात्याला विनंती केली, 

“आम्हाला आमची चूक मान्य आहे. हे नाटक बंद झाले तर त्याचे आम्हां सर्वांवर, आमच्या कुटंबीयांवर होणा-या परिणामांची आम्हाला जाणीव झाली आहे. पण खरं सांगायच तर, या नाटकातील आमची भूमिका योग्य प्रकारे कशी करायची हे आम्हाला समजत नाही, कळत नाही आणि अज्ञानवश आमच्याकडून चुका होत जातात. त्यामुळे या नाटकातील भूमिका योग्य प्रकारे करण्यासाठी काय केले पाहिजे हे कृपा करुन सांगावे.”


अभिनेते, अभिनेत्रींच्या या विनंतीवर नाटकाच्या निर्मात्याने स्मित हास्य केले व तो म्हणाला, 

“तुम्ही सर्वजण प्रथम हे लक्षात घ्या की, या नाटकाची निर्मिती करण्याची माझी खूप वर्षांची इच्छा होती, म्हणून मी त्याची निर्मीती केली. ते चालविण्यासाठी मी तुमच्या भूमिका ठरविल्या. हे नाटक माझी सर्वात प्रिय निर्मिती असल्याने ती बंद व्हावी, असे मला कधीही वाटणार नाही. पण माझे काम नाटक निर्माण करणे, त्यातील प्रत्येक पात्राची भूमिका ठरविणे, आणि त्या करण्यासाठी पात्रांची नेमणूक करणे इतकीच आहे. भूमिका कशा रितीने पार पाडावी हे आजवर मी कोणाला स्पष्टपणे सांगितले नाही. 
परंतु नाटकातील मी दिलेली भूमिका सर्व पात्रांना समजावी, ती योग्य रितीने करण्यासाठी मदत व्हावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी मी तुमच्यातील कांही ज्ञानी व्यक्तिंना प्रमुख व सहाय्यक दिग्दर्शकपदी नेमतो. तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुमची भूमिका योग्य रितीने समजाऊन घेऊन करा. असे झाले असता माझी ही सर्वोत्तम, प्रिय निर्मिती, हे नाटक बंद करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही. विमृश्यैतदशेषेण यथेच्छसी तथा कुरू। ” 

ऐवढे बोलून नाटकाचा तो निर्माता आपल्या बंद केबिनमध्ये परतला.

हे नाटक म्हणजे हे विश्व, जे त्याच्या निर्मात्याने स्वप्नात रंगवले आहे. गुरू नानकदेव सांगतात, 

“जग सुपाना बाजी बनी, खिन मेही खेल खेलाये - गुरू नानकजीं” 

या विश्वरूपी नाटकात सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नद्या, समुद्र, डोंगर, वृक्ष, वेली, फुले, जीव, जंतू, किटक, प्राणी, पक्षी व माणूस ही पात्रे आहेत. 
महायुद्ध, अणु-परमाणू बॉम्ब स्फोट, आतंकवादी हल्ले, टोकाची कडवी जात्यंधता व त्यातून उसळणा-या दंगली, त्यात बळी पडणा-या स्त्रिया, लहान बालके आणि भूकंप, जमीन खचणे, जंगलातील न विझणा-या आगी, दुष्काळ, अतिवृष्टी, महापुर, त्सुनामी अशा आपत्तीतून हे विश्वरूपी नाटक बंद पडण्याचा गंभीर इशारा विश्वनिर्मात्याने माणसाला अनेकदा दिला. 

असाच एक गंभीर इशारा नुकताच कोवीड महामारीच्या संकटातून दिला गेला आहे.    
विश्वनिर्माता वारंवार देत असलेले गंभीर इशारे कांहीनी फक्त पाहिले. कांहीना फक्त ऐकले. कांहीनी त्याकडे दुर्लक्ष केले. कांहीनी त्यावर टीका केली तर, कांहीनी त्यांचा स्वार्थासाठी व सत्तेसाठी उपयोग करून घेतला. पण कांही लोकांनी मात्र विश्वनिर्मीत्याने मनुष्यासाठी सांगितलेली प्रेम, ममता, करूणा, दया, सहकार्य, सौहार्द, समता अशा दैवी गुणांनी आभूषित, माणुसकीची भूमिका ज्ञानी दिग्दर्शकांकडून आणि त्यांनी लिहिलेल्या  ग्रंथ, पोथी-पुस्तक, कथा, गीत, भजन, अभंगातून जाणून घेतली आणि ख-या अर्थाने ते आपली भूमिका जगू लागले. 

असे कांही सुदैवी लोक वगळता, इतर बहुसंख्य लोकांना अजूनही ज्ञानी दिग्दशर्कांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला नाही. त्यामुळे आजच्या पुढारलेल्या काळातही ते वंश, वर्ण, कातडीचा रंग, धर्म, जात, पात, पंथ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, अहंकार, रूढी, द्वेष, तिरस्कार, कटुतेच्या विषारी विळख्यात सापडुन आपली माणूसकीची मूळ भूमिका विसरून गेले आहेत. अशा अज्ञ, दुर्दैवी लोकांना ज्ञानी दिक् दशर्कांचे योग्य मार्गदर्शन लवकरात लवकर मिळावे, त्यांनी माणूसकीची भूमिका जगावी आणि विश्वरूपी हे नाटक चिरतंन राहावे हीच जगन्मातेच्या चरणी प्रार्थना. 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण