| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाशी जुळवून घेत, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असतानाच महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीररीत्या केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
महायुतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मांडीला मांडी लावून बसतो खरं, पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, हे सहन होत नाही. कारण मी हाडामासाचा शिवसैनिक आहे आयुष्यात कधीही काँग्रेस व राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. असे धाराशिव येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत यांनी म्हटले होते.
यावर अजित पवार गटाचे नेते व राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर देताना, जोरदार टीका केली आहे. आमच्या नेत्यावर कोणी अशा पद्धतीने टीका करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशी वक्तव्य ऐकण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू आपल्यालाही सत्तेची गरज नाही असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना उमेश पाटील पुढे म्हणाले की, भाजपमुळे तुम्ही सत्तेत आहात. आम्हालाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सत्तेत सहभागी करून घेतले आहे. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये. सावंत आणि पाटील यांच्या जाहीर वाकयुद्धानंतर महायुतीत सारे काही आलबेल आहे या समजुतीला छेद गेला आहे. आता देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे या दोन नेत्यांमध्ये कसा समझोता घडवून आणतात हे पहावे लागेल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी अशा पद्धतीने जाहीर वक्तव्य केल्याने, समाजात चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे कुठल्याही नेत्याने महायुतीबद्दल गैरसमज निर्माण होईल, चुकीचे संदेश जातील अशी वक्तव्ये करू नयेत, असे यापूर्वीही महायुतीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना समज दिली होती. तरीही वारंवार अशा पद्धतीची वक्तव्य केली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.