yuva MAharashtra शासनदरबारी भोई समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -पृथ्वीराज पाटील ! भोई समाज घटकास छत्री वाटप...

शासनदरबारी भोई समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -पृथ्वीराज पाटील ! भोई समाज घटकास छत्री वाटप...



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑगस्ट २०२४
शासनाकडून मोफत जाळे, अनुदान वाढ, अनुदान तत्त्वावर मत्स्यबीज घरकुल योजनेचा लाभ आणि भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करणे या प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. मासेमारी व विक्री व्यवसाय करणाऱ्या गणेशनगरातील भोई बांधवांना पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, "बारा बलुतेदारानंतर अठरा अलुतेदारापैकी भोई समाजातील बांधव हा मुख्यत: मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. हा समाज प्रामाणिकपणे कष्ट करुन जगतो. गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोई बांधव मासेमारी करू शकले नाहीत. सततच्या पावसामुळे त्यांचे जीवनमान पूर्णतः विस्कळीत झाले. जाळी वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. अशावेळी भोई समाज बांधवांना फौंडेशनच्या वतीने छत्र्या वाटप करुन भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना मानसिक आधार देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. असे पृथ्वीराजबाबा म्हणाले.


महिनाभर सतत पडणाऱ्या पावसामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे जे नुकसान झाले आहे ते शासनाकडून मिळवून देऊ आणि भोईसमाजासाठी मासेमारीसाठी लागणारी मदत पृथ्वीराज पाटील (बाबा) फाउंडेशन च्या वतीने करू." असे आश्वासनही यावेळी पृथ्वीराजबाबा पाटील यांनी दिले.

छत्र्या वाटपावेळी विजय आवळे, सागर मुळे, दै. अक्षराजचे पत्रकार प्रमोद चिनके, ॲड. गणेश आर. भोई, व्यापार सरिता चे मुख्य मा.संपादक अनिल आपटे, स्वप्नील जिरंगे, किरण काटकर, अमोल भिलवडीकर व त्यांचे सहकारी आणि भोई समाजातील बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.