yuva MAharashtra नष्ट होण्याआधी होऊ जागे ! (✒️राजा सांगलीकर)

नष्ट होण्याआधी होऊ जागे ! (✒️राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २२ ऑगस्ट २०२४
Let’s wake-up or we would perish 
निसर्गाच्या सर्व घटकातील प्रदुषणाचे गंभीर परिणाम आणि भौतिक सुधारणेच्या मागे लागून माणूस निसर्गावर मात करू पाहात आहे पण हे अशक्य आहे हे समजले की निसर्गाला शरण जात, त्याची दया भाकत कवियत्रीने ही कविता रचली आहे.

कविता भाषांतर
“घनिभूत थेंब पाण्याचे लहान, 
काचेच्या भिंतीवरी होते ठिबकत
हवामान आहे परिणाम दाखवत
कडक सूर्यकिरणे गवत सुकवत
उष्णता पोहचली चरम सीमेत
तहानेने आहे सुकला घसा
प्रकृती माते दाखव थोडी दया
आम्ही माणसं आत्मकेंद्रित 
परि करूणा तुझी अपरंपार
वाचव आम्हा या संकटातून
जागे व्हा या संसारातून”

उदाहरणादाखल दिलेल्या कवितांच्या मराठी भाषेतील भाषांतरातुन ‘Words Became Poetry!’ या काव्यसंग्रहातील कवितातील भावाची, संवेदनांची, संदेशांची कल्पना येते. या कविता संग्रहातील कविता जुई पुरोहित यांनी लिहिल्या आहेत. जुई पुरोहित, पुर्वाश्रमीच्या जुई कावेरी. सांगली शहरात राहणारे श्री. उदय कावेरी यांच्या सुकन्या. त्या इंजिनियर, एम.बी.ए. पदवीप्राप्त आहेत. कवितासोबत त्या ब्लॉग, लघुकथा आणि सुभाषितांचे लेखनही करतात. आपली नोकरी, घर, मुले, संसार सांभाळुन मनातील भावना, विचार शब्दरूपाने प्रगट करण्याचा त्यांनी जोपासलेला छंद कौतुकास्पद आहे.
हा काव्यसंग्रह ‘BookLeaf Publishing’-बुकलिफ पब्लिशिंगने ISBN ९७८९३५७७४९२६८ प्रमाणे प्रसिद्ध केला असुन amozon.in ॲमॅझोन.इनवर, रसिक वाचकांसाठी उपलब्ध आहे. 
आशा करतो, या कविता जशा मला आवडल्या तशा इतर मराठी भाषिक रसिकांनाही आवडतील.


या कवितासंग्रहातील आणखीही काही कवितांचे रसग्रहण...

Mom, sing me a lullaby! गा आई, अंगाई गीत माझ्यासाठी !

जीवनात दुःखाचे कठीण प्रसंग आल्यावर मनाच्या होणाऱ्या स्थितीचे, मानसिक आंदालनाचे आणि आईच्या मायाळू हाताची, अंगाई गीताची आठवण हे सर्व भावपूर्ण शब्दात या कवितेत उतरले आहे. कवितेतेतील हे भावपूर्ण शब्द सोपे, सरळ, हृदयाला भिडणारे असल्याने कविता वाचतना समजतात.

कविता भाषांतर
“वाहुन गेल्या रात्री दुःस्वप्नांनी
जीवन बनले कठोर आई 
होते कधी प्रेम, भरवसा जिथे  
उरले झगडणे, धडपड आता तिथे
श्वास घेणे, लटकणे याची आता धांदल
कापणे, दुखणे आहे नेहमीचे
जखमावर मलमपट्टीने वाटचाल आहे जारी
उसासे टाकुन आता मी आहे थकलेली 
व्हावे बंधन मुक्त तोडून हा पिंजरा 
नाही होत सहन हे सारे आता मला 
विषाद माझा कशात मी आता सामावू 
झोपु दे कांही क्षण मला, दशा कमी होऊन 
जाण्या झोपी मी आई, गाशील का एक अंगाई 
येणा-या सगळ्या राती”

------------------------------

Like the river flows into sea! 
जशी सरिता मिळे सागराला!
या कवितेत कवियत्रीने इतरांमध्ये जे चांगले आहे ते आपल्या आचरणात आणले असता जीवन आनंदी बनते, हा विचार वृक्ष व नदीचे उदाहरण देऊन मांडला आहे. वृक्ष जो विविध प्रकारे इतरांना मदत करत असतो. स्त्री, पुरूष, उच्च, नीच, गरीब, श्रीमंत, आणि धर्म, जात, पंथ, वंश, कातडीचा रंग, स्थान असा कोणताही भेदभाव न करता वृक्ष सर्वांना सारखीच त्याची सावली, फळे, फुले देत असतो. इतकेच नव्हे तर त्याच्यावर कोणी दगड मारला, त्याला खुडले, कापले तरी त्याला जे द्यायचे असते ते तो देतच राहातो. वृक्षाजवळ असलेला हा चांगला गुण कवियत्री स्वतःच्या आचरणात आणते आणि त्यातुन मिळालेला अनुभव शब्दातुन उतरवताना म्हणते...

“देत राहाते वृक्षासारखे मी जेंव्हा, 
मुक्त वाटते मम मनाला तेंव्हा, 
एक शांतता वाहते मनी माझ्या, 
जशी सरिता मिळे सागराला,” 
नदी समुद्राला मिळण्यासाठीच वाहत असते, आणि समुद्रात मिळाल्यावर सरिता-नदी स्वतःच समुद्र बनते !
“पाहता उपयुक्त जे जे, देते जोर त्यावरी
आनंदाचे कारण माझ्या आहे ते खरी!
नाही करत अति विचार मी 
निश्चिंत असते सदा मी
आहे मी जशी, वागते मी तशी 
देत राहाते वृक्षासारखे मी जेंव्हा  
मुक्त वाटते मम मनाला तेंव्हा 
एक शांतता वाहते मनी माझ्या
जशी सरिता मिळे सागराला, जशी सरिता मिळे सागराला!”

-----------------------------

Frozen hearts thaw…. 
पिघळती हृदये गोठलेली….
ही कविता वाचताना राहून राहून मला अमेरिकन कवी जेम्स पॅट्रिक किनी यांनी १९६० साली लिहिलेली “The Cold Within- गोठलेले अंतरंग” ही प्रसिद्ध कविता आठवत होती. “The Cold Within” ही कविता धर्म, जात, पात, पंथ, वंश, कातडीचा रंग, संपत्तीच्या कुविचारामुळे माणसाची हृदये दगडाची बनून निर्माण होणाऱ्या स्वार्थीपणाचे आणि पूर्वग्रहाचे परिणाम ठळकपणे दर्शवते. आणि, मानवतेला सक्रियपणे कसे वागता येईल यावर विचार करायला भाग पाडते. 
तर, ‘वर्डस बिकेम पोयट्री’ या कवितासंग्रहातील Frozen hearts thaw…. 
पिघळती हृदये गोठलेली …. ही कविता करुणा, सहानुभूती आणि मानवतेच्या महत्त्वपूर्ण संदेशाला बळकट करते. माणसांला त्याच्या मुख्य धर्माचे- माणुसकीचे पालन करण्यासाठी काय करावे लागते हे सोप्या शब्दात सांगते. या दोन्ही कवितातीसल संदेश संयुक्तपणे विचारात घेतले असता इतरांशी कळकळीने, दयाळूपणाने, आणि समजूतदारपणाने वागल्याने माणुसकीची जोपासना होऊन महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो असा महत्वाचा संदेश मिळतो. 

कविता भाषांतर
“खोल बर्फातून जड पावलानी होती चालली ती
सोडून मागे ठसे तिच्या पावलांचे 
हिम्मतीने न पाहता माघारी 
फिकट गुलाबी चेहरा झाकला होता दुःखाने 
होय, दुखावले, दुःखी झाले.....
तुटले होते हृदय तिचे
जात आहे तरीही जिंकण्यासाठी ती पुढे
सारून दूर सारी उदासीनता
अन गाडून अंतरी सारी व्यथा 
उबदार एक हात पोहचला गोठलेल्या तिच्या हृदयाजवळ 
पाहुन भाव विश्वासाचे डोळ्यातील त्याच्या 
खात्री पटता हावभावांची झाली ती शांत,  
अन पिघळले गोठलेले हृदय तिचे  
अशीच असती पिघळत हृदये गोठलेली!”

-----------------------------

She Was Abandoned, 
दिले होते टाकून तिला
ही कविता वाचताना डोळे पाण्याने टचटचुन भरतात. या कवितेतील शब्द नुकत्याच जन्म घेतलेल्या कोवळ्या जीवाला विकृत विचारांच्या समाजाच्या भितीने टाकून देणा-या कुप्रथे बरोबरच समाजातील मानवतेचेही दर्शनही घडवतात. एक अश्राप लहान जीव त्याची कांही चूक नसताना कचऱ्याच्या कुंडीजवळ, किंवा अनाथालयाच्या दाराशी त्या बालकाचे आई-वडिल कठोर मनाने समाजाच्या निंदेला भिऊन टाकून देते. मोहाला बळी पडलेल्या आई-वडिलांच्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप जीवाला जर तो जगला वाचला तर जन्मभर भोगावी लागणार असते. अनौरस- जन्मखुणाची शिक्षा भोगणा-या कर्णाची कथा महाभारतात आहे. असे हजारो, लाखो कर्ण आजही आपल्या समाजात आहेत. फक्त रडणे माहित असलेला लहानशा जीवाला पाहून सहृदय व्यक्तिचे हृदय कळवळुन उठते. ते त्या बालकाला उचलून घेतात, आपल्या हृदयाशी कवटाळतात, त्याचे संगोपन करतात. या व्यतिरिक्त माणुसकीचे श्रेष्ठ उदाहरण विरळच पाहायला मिळत असेल. हे सर्व या कवितेत अतिशय संयमितपणे कवियत्रिने मांडले आहे. उदाहरणार्थ या कवितेतील ओळी- 

“होती ती पडली एक दिवशी कचऱ्याच्या कुंडीजवळ
पण मिठी मारली देवदूतांनी त्या वंचित संतानाला”
कवितेच्या या ओळी माया, ममता, करूणा, सहृदयता, प्रेम, अशा दैवी गुणांनीयुक्त माणसे जी देवदूत, देवाचे दूत असतात. हा सुंदर विचार मनाला स्पर्शून जातो. आणि, “जिसका कोई नही होता उसका खुदा होता है” हे पटते. 
कवितेच्या शेवटी “Sleeping Beauty”- निद्रीस्त सौंदर्य परिकथेचा केलेला उल्लेख शुद्ध, निरागस प्रेमाची मूर्त शक्ती जगातील कोणत्याही गोष्टीला पराभूत करू शकते या सत्याची आठवण करून देते. 
समाजातील कुप्रथेवर विचार करायला भाग पाडून मनाला भावणारी, हृदयाच्या तारा छेडणारी ही कविता वाचताना डोळ्यात अश्रु उभारतात.
कविता भाषांतर

“दिले होते टाकून तिला,
नाकारुन कुटुंबातून, 
जे मानत होते ओझे तिला
होती ती पडली एक दिवशी कचऱ्याच्या कुंडीजवळ
पण मिठी मारली देवदूतांनी त्या वंचित संतानाला.
रडून सुजले होते तिचे डोळे आदिपासुनी
लोरी गात त्यांनी कवटाळले छातीशी तिला 
घेत होती निद्रित सौंदर्यासम डुलकी ती, 
तिच्या नवीन आईच्या कुशीतील उबेने जागी झाली ती
पाहुन ते तीव्र दुःख हृदय पाघळले मातेचे,
निरागस डोळ्यांतील तिच्या मोहक चमकीने!”