| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ ऑगस्ट २०२४
बांगलादेशातील राजकीय अशांततेचा ज्वालामुखी भडकला असून याची झळ तेथील हिंदूंना तर बसत आहेच, पण तेथे शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या विद्यार्थ्यांना याची धग जाणवत आहे. परिणामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर येत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून बांगलादेशातील विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्याची पावले उचलली आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भडकलेल्या आगीत तेथील हिंदूंची मालमत्ता खाक होत आहे. भारत विरोधी शक्तींनी हिंदूंना टारगेट केल्याने अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी प्राधान्य दिले आहे. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित धडक कारवाईची गरज अधोरेखित केले आहे.
प्रभावित विद्यार्थ्यांना सर्वतो मदत करण्याची विनंती तेथील भारतीय उच्चायुक्तांना केले आहे. त्यानुसार त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगला देशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात परतण्यासाठी सुरक्षित प्रक्रिया जलद गतीने राबविणे या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी शासनातील वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवला असून, बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करण्यात येत आहे.
तेथील विद्यार्थ्यांची तातडीने संपर्क साधून मदत उपलब्ध करून देणे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवणे यासाठी केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक खास पथकही स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे वास्तव्यस असलेल्या विद्यार्थ्याबाबत महाराष्ट्र शासन गंभीर असून, महाराष्ट्रातील त्यांच्या पालकांनी कोणतीही काळजी करू नये असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.