yuva MAharashtra मुख्यमंत्री भावाने भाऊबीज दिली, बँकेने ती कापून घेतली, अनेक भगिनींचा संताप !

मुख्यमंत्री भावाने भाऊबीज दिली, बँकेने ती कापून घेतली, अनेक भगिनींचा संताप !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ ऑगस्ट २०२४
अत्यंत गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील लाखो बहिणींसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत या योजनेतील 3000 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा झाले. बहिणींनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री भावाला धन्यवादही दिले. सांगलीतील एका बहिणीने तर आपल्या मंगळसूत्रातून मुख्यमंत्र्यांसाठी अफलातून राखी भेट केली. 

पण काही बहिणींचा मात्र हिरमोड झाला असून बँकांनी या काही भगिनींच्या हातावर 500 अथवा हजार रुपये टेकवले आहेत. या भगिनींनी याबाबत बँक अधिकाऱ्यांना विचारले असता, बँक खात्यावर मिनिमम बॅलन्स नसल्याने ही रक्कम कापून घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता बँकेच्या नियमाप्रमाणे जर ही रक्कम कापून घेणार असतील, तर त्यांची ही चूक म्हणता येईल का ? आणि दर महिन्याला खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार का ? असा प्रश्न या भगिनींना पडला आहे.


तर काही भगिनींना प्रश्न पडला आहे की दर महिना पंधराशे रुपये ची ही रक्कम केवळ निवडणुका होईपर्यंतच आहे ? की निवडणुका झाल्यानंतरही ही रक्कम मिळणार आहे. महायुती आणि महाआघाडी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ही योजना निवडणुकीनंतर ही सुरू राहण्याचे संकेत दिले आहेत. महाआघाडीच्या नेत्यांनी तर आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देहू असे म्हटले आहे. त्यामुळे महिला वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.