Sangli Samachar

The Janshakti News

वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीच्या गोडाऊनला आग, दीड कोटी रुपयांचे नुकसान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ ऑगस्ट २०२४
कुपवाड नजीकच्या सावळी हद्दीत असलेल्या वेस्टर्न प्लेसिकास्ट मधील पॅटर्न ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या आगीत कास्टिंग निर्मितीसाठीचे लाखो रुपयांचे लाकूड आणि ॲल्युमिनियमचे पॅटर्न जळून खाक झाले. या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीचे कर्मचारी, अधिकारी व अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सलग सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

सावळी हद्दीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट फौंड्रीमध्ये देश आणि विदेशातील विविध कंपन्यांसाठी लागणारे लोखंडी व स्टील कास्टिंगचे उत्पादन केले जाते. हे कास्टिंग तयार करण्यासाठी लागणारे ॲल्युमिनियम आणि लाकडाचे पॅटर्न कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. ऑर्डरनुसार या पॅटर्नमध्ये लोखंड आणि स्टीलचा रस ओतून कास्टिंग तयार केले जायचे. गोडाऊनच्या एका बाजूला सुरुवातीस ही आग लागली. त्यामुळे कोणालाच काही समजू शकले नव्हते. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर सर्वांना याची जाणीव झाली. तोपर्यंत आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात उसळल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाने तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. 


त्यानंतर एमआयडीसी, सांगली महापालिका, शिरोळ, दत्त कारखाना, कुरुंदवाड, तासगाव, आष्टा, विटा या नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत गोडाऊन मधील बरेचसे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. ज्याची किंमत दीड कोटीच्या आसपास असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले.

ही आग पाहण्यासाठी सावळी, कुपवाड व एमआयडीसी मधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी ही गर्दी हटवल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या गोडाऊनच्या ठिकाणी पोहोचल्या व आग विझवण्यासाठी सुरू झाले.