| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने (एकनाथ शिंदे) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात साक्षीदार असलेल्या विनायक पिल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला करून दोन्ही हात तोडल्याची खळबळजनक घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथील विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी माजी नगरसेवक असलेल्या लेणी मुकु यांच्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 20 ऑगस्टला कोर्टात सुनावणी होती. विनायक पिल्ले हे यामध्ये मुख्य साक्षीदार होते. त्यांनी साक्ष देण्यासाठी कोर्टात जाऊ नये यासाठी मुक्कु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पिल्ले यांना जबर मारहाण केली आहे.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर विनायक पिल्ले हे आपल्या बहिणीच्या घरून परतत असताना, वांद्रापाडा येथील गुड्डू नावाच्या तरुणाने त्यांना अडवून चिंचपाडा येथील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेले. तेथे पिल्ले यांना सोमेश्वर आणि मुक्कु यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केली. त्यानंतर पिल्ले यांना अंबरनाथ येथील ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील मैदानात नेऊन हातपाय बांधले व तब्बल तासभर पुन्हा बेदम मारहाण केले यामध्ये त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. याच अवस्थेत त्याला तेथे टाकून सर्वांनी पलायन केले, असा आरोप पिल्ले यांनी केला आहे.
या घटनेनंतर नेरळ पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर तो अंबरनाथ पश्चिम पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. या दरम्यान गुन्ह्याच्या नोंदीमध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप विनायक पिल्ले याने केला आहे. सध्या पिल्ले यांच्यावर भिवपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फेरफार केल्याच्या आरोपाबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.