Sangli Samachar

The Janshakti News

स्वयंसेवी संस्था राष्ट्रनिर्माणाचे कार्य करतात, सांगलीत जे घडतं त्याचा आदर्श महाराष्ट्र घेतं - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
सांगली जिल्ह्यातील ६५० स्वयंसेवी संस्था, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वैद्यकीय सेवा, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार, पर्यावरण संवर्धन इ. उपक्रमांतून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करतात. या संस्था समाजासाठी तळमळीने काम करतात. सगळं काही शासन करु शकत नाही. छोट्या छोट्या स्वयंसेवी संस्थांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभार व समाजोपयोगी कार्यामुळे शासनाचा भार हलका होतो, असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हाध्यक्ष व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी नुकतेच केले. पृथ्वीराज पाटील फौंडेशन व ऑल इंडिया एनजीओ फेडरेशन आयोजित सांगली जिल्ह्य़ातील एनजीओसाठी सीएसआर फंड व बीज चेंडू (सीडी बाॅल) प्रकिया व माहिती कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

आपलं काम छोटं समजू नका. शैक्षणिक संस्थांमुळे समाजाची प्रगती होत असते. छोट्या स्वयंसेवी संस्थांना सीएसआर फंड मिळाला पाहिजे, असे सांगून पृथ्वीराज पाटील म्हणाले की, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्यासाठी बीज चेंडू उपक्रम आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्थांनी कार्यशाळेत एकत्र येऊन संवाद साधला तर चांगल्या कार्याला चालना मिळते. सांगलीत जे चांगले घडते त्याचा आदर्श महाराष्ट्र घेतं. असे प्रतिपादन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केले.


प्रारंभी स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ग्लोबल अब्रॉड एज्युकेशन कं. चे रुतुराज शिवराज पाटील यांनी प्रास्ताविकात डिजिटल माध्यमातून युवकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक भान ठेवून कार्यात सातत्य ठेवले पाहिजे. सामाजिक चळवळीची घट्ट मोट बांधून अडचणीवर मात करण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन केले.

या एकदिवसीय कार्यशाळेत हर्षकुमार चौगुले यांनी सीएसआर फंड संकल्पना, प्रकल्प लेखन, सेवाभावी संस्थांची भूमिका, शासनाचे नियम व प्रस्ताव पूर्तता, सौ. आदिती कुंभोजकर यांनी सीड बाॅल संकल्पना व त्याचे फायदे, एम. डी. माळी वकील यांनी संस्था नोंदणी, बदल अर्ज, इतिवृत्त व धर्मादाय आयुक्तांकडे सादर करावयाची कागदपत्रे तर मुराद पटेल यांनी संस्था लेखापरीक्षण, हिशेबपत्रके ट्रस्ट ऑफिसला सादर करायची कागदपत्रे इ. बाबत विवेचन केले. 

स्वागत व प्रास्ताविक स्नेहजीत प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौंडाजे तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी मानले. या कार्यशाळेच्या आयोजनात पृथ्वीराज पाटील व जीपीएमटीचे विश्वस्त विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. एनजीओ फेडरेशनचे प्रशांत माने व स्नेहल गौंडाजे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.