| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
शंभर फुटी रोडला दिगंबर मेडिकलच्या समोर पाच बाय सातचे रस्त्याच्या मधोमधच भगदाड पडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोक्याचा इशारा दिल्यामुळे, ॲक्सिडेंट होता होता वाचले. नागरिकांच्या जागृतीमुळे जीवित व वित्तहानी झाली नाही. या ठिकाणी पाहणी केली असता लक्षात आले की, केंद्र शासनाच्या निधीतून हा रस्ता पीडब्ल्यूडी विभागाने केला आहे. त्याची देखभाल दुरुस्ती ही महानगरपालिकडे आहे. त्यामुळे या प्रकाराला ठेकेदार, पीडब्ल्यूडीचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी हे सगळेच जबाबदार आहेत.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याला ज्या टेक्निकल बाबीला धरून रस्ता करायला पाहिजे तो केला गेलेला नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे रस्त्याला अचानक भगदाड पडले. कुठलाही रस्ता करत असताना त्या ठिकाणी पाच ते सहा फूट रस्ता खोदून प्राथमिकला तीन-चार दगडांचा थर करावा लागतो. यामध्ये खालती सगळ्यात मोठे दगड, त्याच्यावरती लहान दगड त्याच्यावरती मोठा मुरूम, त्याच्यावरती बारीक मुरूम, आणि खडीचा थर देऊन रस्ता ग्राउंड लेव्हलला पर्यंत करून दोन महिने रस्ता असाच सोडायचा असतो, दोन महिन्यानंतर मग त्याच्यावरती डांबरीकरण करून घेणे हा कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडीचा नियम आहे. परंतु यातील सर्व नियम धाब्यावर बसवलेले दिसत आहेत. यातील कुठलाही नियम पाळला नाही.
ठेकेदार, अधिकारी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सर्व नागरिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मग्न असताना कोणाचं लक्ष नाही बघून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी रस्त्याला, नागरिकांच्या पैशाला चुना लावला आहे. त्यामुळे तेथील ठेकेदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे त्यांना काळया यादीत टाकावे व त्या रस्त्यासाठी असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनिअर, इंजिनियर, सुपरवायझर यांनी 40 ते 50 टक्के टक्केवारी खाल्ल्यामुळे रस्त्याचे निकृष्ट काम झाले. याचाच परिणाम म्हणून रस्त्याला अचानक भगदाड पडले. या कामासाठी केंद्र शासनाने केंद्र शासनाच्या भांडवली निधीतून 15 कोटी,वीस लाख रुपये निधी दिला आहे. रस्त्याचा दर्जा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झाला नाही असे दिसते. अधिकाऱ्यांनी वाटून टक्केवारी खाल्ल्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले अशी नागरिकांतून चर्चा होऊ लागली आहे. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यानी रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर अचानक भगदाड पडले. त्यामुळे शंभर फुटीच्या रोडचे केलेल्या कामाच्या ठेकेदाराला काळया यादीत टाकावे व जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांना निलंबित करावे अशी मागणी राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी केली आहे.
यावेळेला अरविंद ठोंबरे, राजू तासगावकर, संजय पाटील, निहाल तांबोळी, सुरेश ठोंबरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.