| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
एखाद्या धार्मिक कार्यातील असो किंवा मग गणेशोत्सवाची मिरवणूक असो डॉल्बी आणि लेसर किरणांचा शोध असायलाच हवा, असा जणू अलिखित नियमच अलीकडे झाला आहे. परंतु कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या दुष्परिणामाबरोबरच आता डोळे दिपवणाऱ्या लेसर किरणांचे दुष्परिणाम ही समोर येऊ लागले आहेत. या लेसर किरणे मिरवणुकी दरम्यान सहभागी असलेल्या अनेक तरुणांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. याबाबत महाराष्ट्रातील नेत्रविकार तज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट असोशियनने लेसर विरोधात भूमिका घेतली असून कोल्हापुरातूनही शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे. सांगलीतील ऑप्थॉल्मॉजिस्ट असोसिएशनचे काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना एक निवेदन दिले असून या लेसरवर शोवर बंदीची मागणी केली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की त्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला छिद्र पडलेले अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सव आणि दसऱ्यादरम्यान विविध मिरवणुका दरम्यान लेसर चा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच अशा रुग्णांची संख्या शहरासह जिल्ह्यातील अनेक नेत्र रुग्णालयातून वाढू लागली आहे. 80 तरुणांच्या डोळ्यांच्या पडद्याला गंभीर इजा झाल्याची नोंद संघटनेने केले आहे.
मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी लेसर मध्ये उष्णतेची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर असते गुगळावर दहा सेकंद यापेक्षा अधिक वेळ लेसर चा किरण स्थिर राहिल्यास डोळ्यांच्या पडद्याला छिद्र पडते आणि यावर शस्त्रक्रिया शिवाय पर्याय नसतो. परंतु अशी शस्त्रक्रिया केल्यानंतरही 75 टक्के पर्यंतच दृष्टी परत मिळते.
दरम्यान नाशिकमध्ये नेत्र तज्ञांनी लेसरच्या दुष्परिणामचे गांभीर्य स्पष्ट केल्यानंतर तेथील पोलीस प्रशासनाने यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकीत लेसरच्या वापरावर पूर्ण निर्बंध जाहीर केले आहेत तोच निर्णय सांगली कोल्हापूरसह राज्यभरात लागू व्हावा यासाठी नेत्रतज्ञांचा पाठपुरावा शासनाकडे सुरू आहे.
याबाबत सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विद्यासागर चौगुले म्हणाले की लेसर मुळे नेत्र पटलांना इजा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आमच्याकडे उपचारासाठी येत आहेत. यामध्ये 20 ते 30 वर्षीय तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या विघातक लेसर किरणांचा मिरवणुकी दरम्यान वापर बंद व्हावा असे आमचे प्रयत्न आहेत. पोलीस अधीक्षकांनाही लवकरच याबाबत निवेदन देणार आहोत, असेही चौगुले यांनी म्हटले आहे.