yuva MAharashtra महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची कन्याच म्हणतेय, खऱ्या अर्थाने अजूनही स्त्री स्वातंत्र्य मिळालेच नाही !

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची कन्याच म्हणतेय, खऱ्या अर्थाने अजूनही स्त्री स्वातंत्र्य मिळालेच नाही !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या अगदी कोवळ्या वयातील कन्येसह, तरुणी अत्याचाराला बळी पडत आहेत. यावर देशाचे अत्यंत कडक कायदे असूनही, याचा कोणताही परिणाम असे अत्याचार करणाऱ्यांच्या मानसिकतेवर होताना दिसत नाही. त्यामुळे ना कायद्याची भीती आहे, ना पोलिसांचा धाक ! आणि म्हणूनच सर्वसामान्य घरातील लहान बालिका आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. याबाबत राज्य व केंद्र सरकारवर सार्वत्रिक आरोप होतो आहे.

परंतु जेव्हा महाराष्ट्रासारख्या प्रगतीपथावरील राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांची कन्याच याबाबत जर साशंक असेल, तर परिस्थितीचे गांभीर्य अधिक अधोरेखित होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुकन्या दिविजा फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर काल स्वातंत्र्यदिनी एक पोस्ट लिहून याबाबत चिंता व्यक्त केल्याने, हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.


दिवीजा फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतात "ज्या दिवशी स्त्रीला मोकळेपणाने वावरता येईल तोच दिवस 21 व्या शतकातील खरा स्वातंत्र्य दिन असेल."... दिवीजा यांनी कोलकत्ता येथील ट्रेनी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि खुनाच्या समाजमनावर उठलेले ओरखडे अजून ताजे असतानाच आणि नवी मुंबईतील यशश्री अशाच अत्याचाराला बळी पडण्याचा उल्लेख करून या घडलेल्या घटनांमुळे दिवीजा यांनी दुःख व्यक्त करून आज एकविसाव्या शतकातील स्त्रियांची स्थिती अशी आहे, त्यामुळे आज साजरा होत असलेला स्वातंत्र्यदिन हा नाममात्रच म्हणाला हवा, अशी खंत व्यक्त करून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सुरक्षित होणार ? त्यांना मोकळेपणाने कधी फिरता येणार ? ज्या दिवशी स्त्रीला हक्काने मोकळा श्वास घेता येईल तोच खरा स्वातंत्र्याचा दिवस असेल असे दिवीजा फडणवीस यांनी आपल्या या इंस्टाग्राम वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारताचा नागरिक म्हणून घेताना, अशा चुकीच्या गोष्टी का घडतात ? आपल्याला अद्याप स्वातंत्र्य मिळालेले नाही. निर्भया प्रकरणाला बारा वर्षे झाली, पण तरीही वर्तनात बदल झालेला नाही. सुधारणार नाही आणि अशाही नाहीत... गुन्ह्यांची तीव्रता कमी व्हायला हवी होती मात्र ती 100 पटीने वाढलेली आहे. एक तरुण मुलगी म्हणून माझ्या बहिणींच्या सुरक्षेतेची आशा बाळगणे चुकीचे आहे का ? पुरुषांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे का ? असा सवाल करून दिवीजा म्हणतात की पुढच्या वर्षी खरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. जिथे कोणत्याही स्त्रीला तिच्या सुरक्षेची भीती वाटत नाही, जिथे कोणीही पुरुष स्त्रीला त्रास देत नाही आणि जिथे भारताची बंधुता आणि एकता या अशा प्रकाराविरुद्ध आवाज उठवते, असा स्वातंत्र्य दिन आपल्याला साजरा करायचा आहे, अशी अपेक्षा दिवीजा फडणवीस यांनी या आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.