| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दीड-दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी सर्वच पक्षांनी विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी अधिकाधिक आमदार निवडून आणण्याकरिता मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाची शकले झाल्यानंतर, ही त्यांची पहिलीच विधानसभा निवडणूक. त्यामुळे विरोधकांची आमदार संख्या कमी करण्याबरोबरच स्वपक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी मोठी रणनीती आखली जात आहे.
यामध्ये शरद पवारांच्या बरोबरच आता जयंत पाटील यांच्यावर मोठे जबाबदारी येऊन पडली आहे. अशातच त्यांचे राज्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी, सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून, त्यांच्या भोवती चक्रव्यूह निर्माण केला जात आहे. त्यामुळे राजकारणात मुरब्बी असलेले जयंत पाटील यांच्यासमोर केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा चक्रव्यूह कसा भेदतात याकडे राजकीय क्षेत्रासह नागरिकांतून मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
भाजपाने निशिकांतदादा पाटील यांच्या रूपाने त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले असतानाच, महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस मधील यंग ब्रिगेडही उघडपणे नसला तरी कृपया मार्गाने जयंत पाटील यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करण्याची संधी शोधत आहे. जयंत पाटील यांचे राजकारण नेहमीच काँग्रेससाठी अडचणीचे ठरले आहे. विशेषतः दादा घराण्याला रोखण्यासाठी त्यांनी अनेक खेळ्या खेळलेल्या आहेत. आणि आता याच त्यांच्या खेळ्या त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशातच केवळ आपल्या सुरक्षित मतदार संघातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात त्यांना विरोधकांना नामोहरण करण्यासाठी जयंत पाटील यांना सारी शक्ती पणाला लावावी लागणार आहे. एकीकडे भाजपा तर दुसरीकडे अजित पवार गट याशिवाय काँग्रेस अंतर्गत मोठा गट जयंत पाटील यांना रोखण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. आणि म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक केवळ राष्ट्रवादी (शरद पवार गट) साठीच नव्हे नव्हे तर स्वतः जयंत पाटील यांच्यासाठी ही अटीतटीची ठरणार आहे.