yuva MAharashtra आ. नितेश राणे यांनी तात्काळ पोलीस कुटुंबीयांची माफी मागून राजीनामा द्यावा, सेवानिवृत्त पोलीस संघटनेची मागणी !

आ. नितेश राणे यांनी तात्काळ पोलीस कुटुंबीयांची माफी मागून राजीनामा द्यावा, सेवानिवृत्त पोलीस संघटनेची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
आमदार नितेश राणे यांनी तात्काळ पोलीस कुटुंबियांची माफी मागून राजीनामा द्यावा. पोलीसांची बदली करुनच दाखवा सेवानिवृत पोलीस संघटना, पोलीस कुटुंबिय, पोलीस बॉईज यांचे वतीने आंदोलन करण्यात येईल असे आव्हान सांगली सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

या पत्रकामध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने पोलीसांचे विरुध्द वाट्टेल तसे प्रक्षोभक वक्तव्य करुन संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करीत आहेत. परवा त्यांनी सांगली जिल्ह्यात पलूस या ठिकाणी भाषण करत असतांना "गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर आहेत ते आमचे बॉस आहेत. पोलीसांची बदली अशा ठिकाणी करेन की, त्यांना त्यांच्या बायकोचा फोन लागणार नाही" असे वक्तव्य आ. नितेश राणे यांनी करुन पोलीसांना एक प्रकारची धमकी दिलेली आहे. त्यामुळे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोधर्य खच्चीकरण होत आहे.


वास्तविक पाहता स्वतः नितेश राणे हे पोलीसांचे संरक्षण घेवून फिरत असतात. असे असतांना, त्यांनी पोलीसांबाबत असे वक्तव्य करुन त्यांनी हे महाराष्ट्र राज्य नसून बिहार राज्य असल्याचे भासवित आहेत. 

सेवानिवृत्त पोलीस संघटना व कर्तव्यावरील पोलिसांचे कुटुंबिय, पोलीस बॉईज असे त्यांचे या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत असून आमदार नितेश राणे यांनी आपले शब्द मागे घेवून पोलीसांची जाहीर माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत शिंदे यांनी केली आहे.

आमदार नितेश राणे यांचे असे वक्तव्य हे पहिल्यांदाच नाही यापूर्वीसुध्दा वेळोवेळी महाराष्ट्र राज्यात त्यांनी "पोलीस माझा व्हीडीओ काढून काय करतील तर फारफार तर त्यांचे बायकोला दाखवतील" असे पोलीस पत्नींचे बाबत अपमानास्पद व गलिच्छ वक्तव्य केलेले आहे. त्यावेळी सुध्दा त्यांचे विरुध्द संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध झालेला होता. परंतु गृह खात्याकडून त्यांच्या विरुध्द कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांचे असे बेताल बोलण्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द कोणतीच कायदेशीर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांनी आपले असे वक्तव्य करणे चालूच ठेवले आहे.

या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी डॉ. श्री. राजा दयानिधी व पोलीस उपअधीक्षक श्री अरविंद बोडके यांना तसे सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी श्री महंमद सनदी, श्री सुनिल भिसे, श्री सुरेश पाटील, श्री शंभूसिंग रजपुत, श्री पांडुरंग मोटे, नंदकुमार दळवी, श्री तुकाराम नानगुरे इत्यादी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.