| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
क्रांतीदिन ९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणादायी दिवस आहे. म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट १९४२ रोजी 'चले जाव' चळवळ उभी राहिली. भारतीय जनतेने काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. असंख्य स्वातंत्र्य सैनिक हुतात्मे झाले म्हणून भारत स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य प्राप्ती ही देशाला काँग्रेस पक्षाची शाश्वत व शक्तीशाली देणगी आहे. काँग्रेस पक्षाने भारताला स्वराज्य व सुराज्य देऊन चौफेर विकास केला. स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानाचा आदर व रक्षण करणे हेच खरे हुतात्म्यांना अभिवादन होय, असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले. हुतात्मा स्मारक येथे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उत्तराधिकारी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
सांगली शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून १० वर्षे आणि आता अध्यक्ष म्हणून १० वर्षे अशा दोन दशकी वाटचालीत सांगली काँग्रेस पक्षाची तळागाळातील लोकांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवली. पडत्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व सेवा दलाच्या साथीने पक्षाचे संघटन मजबूत करुन सांगली काँग्रेसला वैभव प्राप्त करुन दिले. असे सांगून पृथ्वीराज बाबा म्हणाले की, यापुढेही काँग्रेस पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी मेहनत करु या.
हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र पवार व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी अशोक कुष्टे, अनिल माने, प्रमोद लाड, जयसिंग सावंत, नारायण जाधव, अशोक पोरे, अजय पवार, अशोक मालवणकर,रघुनाथ नार्वेकर, संतोष पत्रावळे, शहाजी जाधव, अण्णा कोथळे, राकेश देसाई, नंदकुमार बुकटे व बाबगोंडा पाटील यांचा शाल व बुके देऊन पृथ्वीराज पाटील, अजित ढोले, अरुण पळसुले व प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते सत्कार करुन देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे म्हणाले, '१८५७ च्या बंडानंतर सर्वात मोठे बंड म्हणजे चले जाव चळवळ होय. काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्ते व नेत्यांनी आपली घरं दारं उध्वस्त करुन घेतली म्हणून देश स्वतंत्र झाला. हा इतिहास कोणालाच विसरता येणार नाही. नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास समजला पाहिजे.
यावेळी अजित सुर्यवंशी, भाऊसाहेब पवार वकील, अजित ढोले, अल्ताफ पेंढारी, शहाजी पाटील, विठ्ठलराव काळे, पैगंबर शेख, अरुण पळसुले, अल्लाबक्ष मुल्ला कवठेमहांकाळ, मनोज लांडगे, विशाल सरगर, मनोज पवार, शिवाजी सावंत, मौला वंटमुरे, शमशाद नायकवडी, सीमा कुलकर्णी, मीना शिंदे व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
आभार अजित ढोले यांनी मानले.