yuva MAharashtra महाराष्ट्रात पुन्हा 'हर घर तिरंगा अभियान', ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रात खास अभियान !

महाराष्ट्रात पुन्हा 'हर घर तिरंगा अभियान', ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रात खास अभियान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय सण. या दिवशी संपूर्ण देशात एक अभूतपूर्व वातावरण असते. विविध उपक्रमांनी हे दोन्ही दिवस राष्ट्रवाद व देशप्रेम भारतीयांच्या मनात आणि हृदयात रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या अनुषंगाने यंदाच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे. राजधानीत केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागा ंची वरिष्ठ पातळीवरील व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा बैठक पार पडली यामध्ये खारगे बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


2022 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवली आहे. त्यानुसार गत दोन्ही वर्षात संपूर्ण देशासह राज्यात प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकला होता. यंदाही त्याच जोशात 'हर घर तिरंगा' फडकवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय राज्यात ठीक ठिकाणी तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनवास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम राबवण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य तिरंगामय करण्याचे ध्येय शासन आणि प्रशासन पातळीवर ठरविण्यात आले आहे. गत दोन्ही वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी केले जाणार आहे. याशिवाय गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरीही यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक नागरिकांनी जाज्वल्य देशप्रेमाची प्रतिमा उजळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन खारगे यांनी केले आहे.