yuva MAharashtra वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी जैन समाज व दक्षिण भारत जैन सभेला मोठे केले - प्रा. एन. डी. बिरनाळे

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी जैन समाज व दक्षिण भारत जैन सभेला मोठे केले - प्रा. एन. डी. बिरनाळे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडीचे..! प.पू.गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या बाहुबली ब्रम्हचर्याश्रम येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि इथेच त्यांच्यातील समाजसेवक व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. गुरुदेव समंतभद्र महाराज आणि बाहुबली संस्था यांनी 'बाबासाहेब घडविला' आणि दक्षिण भारत जैन सभेने वाढविला.

गावोगावी जाऊन युवकांना जैन धर्म आणि देशप्रेमाचे धडे त्यांनी दिले. वीर सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी हजारो व्यसनमुक्त तरुणांची फौज निर्माण केली. भ. महावीर, भ. बुध्द, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विचारांचा सूक्ष्म तपशीलवार अभ्यास व पगडा त्यांच्यावर होता. त्यांचा कुराण, बायबल, पुराणे, जैन व हिंदू धर्माचा अभ्यास दांडगा होता. ते फर्डा वक्ता होते. भारतीय संतांचा अभ्यास करुन संत विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी हयात वेचली. 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा तपशीलवार अभ्यास करुन त्यांनी तरुणांमध्ये देशप्रेम रुजवले. महिलांच्या बद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. साने गुरुजी त्यांच्या आवडीचा विषय होता.त्यांच्या भाषणात छ. शिवाजी महाराज व म. गांधी, साने गुरुजी हमखास असायचे. राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन, शेतकरी, सैनिक व शेतकरी यांच्याबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर होता. प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या कार्याने ते प्रभावित झाले आणि त्यांची पुण्यतिथी सार्वजनिक करून त्यांना घराघरात व मनामनांत पोहोचविण्याचे ऐतिहासिक काम केले. त्यांनी आजन्म ब्रम्हचर्य व्रत घेऊन घरदार सोडून जैन बोर्डींगमध्ये वास्तव करुन पूर्णवेळ समाजसेवा केली.


ॲड. बाबासाहेब कुचनुरे यांनी वीर सेवा दलाच्या माध्यमातून समाज संघटन मजबूत केल्याने दक्षिण भारत जैन सभा तळागाळात पोहचली. अनेक आमदार, खासदार, मंत्री, पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी त्यांना खूप मान द्यायचे. अखिल भारतीय तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीने त्यांना सदस्यत्व बहाल केले होते. दक्षिण भारत जैन सभेने त्यांना मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर घेतले होते. वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे ते अध्यक्ष /कार्याध्यक्ष होते. तीर्थराज सम्मेद शिखरजी, सिध्दक्षेत्र कुंथलगिरी, श्रवणबेळगोळा तीर्थक्षेत्र, अतिशय क्षेत्र कुंडल, बाहुबली ब्रम्हचर्याश्रम,मांगीतुंगी,कचनेर, दहीगाव ही त्यांची आवडती श्रद्धास्थाने.

प्रथमाचार्य शांतीसागर हे त्यांच्या धार्मिक कार्याचे व दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे हे सामाजिक कार्यांसाठी त्यांची प्रेरणास्थाने होती. आज वीर सेवा दल, पतसंस्था, शाळा, दक्षिण भारत जैन सभेचे काम करणारी जी अनेक मंडळी आहेत ती त्यांच्याच तालमीत तयार झाली आहेत. ध.सुरेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली रचनात्मक कार्य करणारी सन्मती संस्कार मंच ही वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याची फलनिष्पत्ती आहे. 

पंचकल्याणिक पूजेत ते भाविकांच्या पादत्राणे स्टँडवर सेवा बजावीत. भोजन मंडपात लोक जेवल्यानंतर पत्रावळ्या उचलायचे. झाडू घेऊन मंडप साफ करायचे. खादीधारी बाबासाहेब मनोभावे हलकी सलकी पडेल ती कामे करायचे. हे पाहून वीर सेवा दलातील स्वयंसेवकांमध्ये चैतन्य संचारुन, युवक समाजसेवेत झोकून द्यायचे. १९८० ते १९८८ या काळात त्यांनी दहा हजाराहून अधिक व्यसनमुक्त सेवाभावी व सुसंस्कृत युवक घडविले. या काळात मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आई वडिलांची काळजी घेणारी हजारो मुले त्यांच्या संस्कारातून घडली. पाठशाळेत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आहे.

ॲड. बाबासाहेब कुचनुरे यांना वीराचार्य व वीरशिरोमणी या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. ते खूप संवेदनशील व हळव्या मनाचे होते. अहिंसा त्यांच्या नसानसात भिनली होती. त्यांचे मामा पारीसा मदभावी (दरुर कर्नाटक) यांनी त्यांच्या कार्याला जीप व पैसा देऊन खंबीर साथ दिली होती. वकिली करताना मिळालेल्या फी मधून ते जैन बोर्डिंग मधील मुलांना औषधे, शाळा/ कॉलेजची फी भरण्यासाठी मदत करायचे. बोर्डींगमध्ये विद्यार्थी तापाने फणफणला तर रात्री त्याच्या जवळ बसुन कपाळावर भिजलेल्या कापडाची पट्टी ठेऊन ताप कमी व्हावा म्हणून जागे रहायचे. पहाटे लवकर उठून बोर्डींमधील स्वच्छतागृहे झाडू मारुन साफ करायचे. ते अनेक मुलांचे पालक बनले होते. त्याग व समाज सेवेचा सर्वोच्च आदर्श होते. 

जैन मुनींच्या आहार विहार सेवेत ते अग्रभागी असायचे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे भले झाले. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था, सांगली जिल्ह्यातील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्था, वीर सेवा दलाच्या शाळा यांच्या माध्यमातून जी प्रचंड मोठी जनसेवा सुरू आहे त्याची पायाभरणी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या निरपेक्ष समाजसेवेत आहे.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांना जाऊन आज ३६ वर्षे झाली परंतु दररोज त्यांची स्मृती जागी होते.त्यांचे उपकार अविस्मरणीय आहेत. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे आई वडील व बंधू आणि सबंध कुचनुरे परिवार गणेशवाडी यांचे समाजावर अनंत उपकार आहेत.
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏

प्रा एन.डी.बिरनाळे 
सांगली. 
८८८८४७५५५२