| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
तब्बल बारा दिवस सांगली शहरातील पूरग्रस्त भागात मुक्काम ठोकलेली कृष्णामाई पुन्हा पात्रात परतली. 2019 ची कटू आठवण घेऊन आलेला 2024 चा महापूर सर्वांच्याच उरात धडकी भरवणारा होता. या काळात तब्बल दोन हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. मात्र निसर्गाने कृपा केल्याने व सांगली, कोल्हापूर, सातारा भागातील धरण प्रशासन आणि पाटबंधारे खाते आणि मुख्य म्हणजे अलमट्टी धरण प्रशासनाने समन्वय साधल्याने महापुराने सांगलीतील नदीकाठी उग्र स्वरूप धारण केले नाही. परिणामी आता, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, जामवाडी, काका नगर, दत्तनगर या ठिकाणच्या नागरिकांनी स्वगृही परतण्यास सुरुवात केली आहे.
मात्र अद्यापही महापुराचे पाणी ओसरले असले तरी, काही भागात त्याच्या अस्तित्वाच्या खुणा राडारोडाच्या रूपाने मागे उरल्या आहेत. येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिक अजूनही निवारा केंद्रात घरी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे शिल्पा दरेकर, आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर आणि 200 कर्मचारी या भागातील नागरी वस्तीत स्वच्छता करण्यात जुंपले आहेत. या भागातील नदी प्रवाहातून वाहून आलेला राडारोडा आणि तब्बल 70 टन कचरा महापालिकेने उचलला आहे.सध्या कृष्णा नदीतील आयर्विन पुलाजवळील पूर पाणी पातळी 20 फुटापर्यंत खाली पोहोचली आहे.