| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागितली असून याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना यात राजकारण न आणता एकत्र येण्याचे आवाहन केले असून, आपण नवीन पुतळा उभा करू असे म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांसह शिवप्रेमींकडून राज्य शासनाला धारेवर धरण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नौदलासह संयुक्त समितीची स्थापना केली असून याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेल्या चुकीबद्दल शिवाजी महाराजांच्या चरणी शंभरदा डोके ठेवायला तयार आहोत. शिवाजी महाराज आपले दैवत आहे, अस्मिता आहे. यासाठी मला कमीपणा वाटणार नाही असे सांगून शिंदे यांनी यावर विरोधकांनी राजकारण करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की याच ठिकाणी छत्रपतींचा रुबाबदार असा भरभक्कम पुतळा उभारण्याबरोबरच विधायक असे काय करता येईल हे विरोधकांनी सांगायला हवं. केवळ विरोधासाठी विरोध न करता सर्वांनी एकत्र येऊन, छत्रपतींची अस्मिता जपण्यासाठी एकसंघ प्रयत्न करूया असेही शिंदे यांनी म्हटले आहे.