| सांगली समाचार वृत्त |
बुधगाव - दि. १७ ऑगस्ट २०२४
आदिअरिहंत संस्थेचे अल्पावधीत झालेली प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी राजाराम तथा पप्पू डोंगरे यांनी केले. कुपवाड येथील आदिअरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बुधगाव मधील शाखेचे करताना ते बोलत होते. संस्थेची ही सातवी शाखा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुधगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कल्पना अर्जुनदास राठोड या होत्या.
यावेळी बोलताना पप्पू डोंगरे यांनी संस्थेचे चेअरमन आदिनाथ धनपाल नसलापुरे व त्यांचे चिरंजीव धीरज आदिनाथ नसलापुरे यांच्या चिकाटीचे कौतुक केले. कुठलीही संस्था चालवताना विश्वास महत्त्वाच्या असल्याचे सांगून डोंगरे पुढे म्हणाले की, नसलापुरे पिता-पुत्रांनी हा विश्वास कमावल्यानेच संस्था अगदी अल्पावधीत इतकी मोठी गरुड झेप घेऊ शकली.
सुरुवातीस संस्थेचे संचालक धीरज नसलापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सुविधा दिल्या जात असल्याने, बुधगावकर नागरिकांना ही पर्वणी असल्याचे सांगून, नसलापुरे म्हणाले की, बुधगावकर नागरिकांनीही आता संस्थेवर विश्वास दर्शवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमास कुपवाड येथील उद्योजक जयपाल चिंचवाडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांच्यासह बुधगाव मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होत्या. शेवटी थीरज नसलापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.