| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
गेले काही दिवस खा. विशाल पाटील यांच्या महाआघाडीतील विशेषतः काँग्रेसच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. काल खा. विशाल पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वादाचे हे वादळ पेल्यातील ठरले. यावेळी त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघासह खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की, सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अंतर्गत कोणताही वाद नाही. तिकीट वाटपानंतर जी स्पर्धा दिसून येत आहे ती संपेल आणि येथे काँग्रेसच्या उमेदवाराला सव्वा लाखाहून अधिक मते पडतील व तो चाळीस हजारापेक्षा अधिक मताने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आटपाडी येथील आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगून खा. विशाल पाटील म्हणाले की, येथे चार तुल्यबळ उमेदवार आहेत ते महायुतीचे आहेत, त्यामुळे या ठिकाणी योग्य उमेदवार शोधून तो निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने लढू. सुहास बाबर यांचे वडील दिवंगत आ. अनिल बाबर हे काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांचे काँग्रेसशी व आमच्या कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांना महाआघाडीतर्फे उमेदवारी देण्याचा प्रयत्न करून निवडून आणण्याबाबत मी बोललो होतो.
यावेळी खा विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला. निलेश लंके हे अजितदादा गटात होते. मात्र त्यांना आघाडीत घेऊन, लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले आणि निवडून आणले. बजरंगदादा सोनवणे सुद्धा अजितदादा गटात होते त्यांना सुद्धा महाआघाडीत घेऊन निवडून आणण्यात आलं. त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील भाजपात होते, त्यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना सर्वांनी ताकतीने निवडून आणले. शेवटी उमेदवार निवडण्याचा अधिकार पातळीवर आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आमचे नेते आहेत. ते जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची आपली जबाबदारी असेल असेही खा. विशाल पाटील यांनी सांगितले.