yuva MAharashtra उपनगरात बंगला विकत घेण्याच्या निमित्ताने ! (✒️राजा सांगलीकर)

उपनगरात बंगला विकत घेण्याच्या निमित्ताने ! (✒️राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ११ ऑगस्ट २०२४
‘Villa in suburbs may hurt your child’s career, उपनगरातील बंगला तुमच्या मुलाच्या कारकिर्दीला नुकसान पोहचवू शकतो.’ हा आहे टाईम्स ऑफ इंडियाच्या नोव्हेंबर ३, २०१९ मधील एका कॉलममधील एका लघु लेखाचा मथळा.
लेखाच्या सुरवातीला एक विधान आहे... उपनगरामध्ये मोठे घर, बंगला विकत घेण्यापूर्वी विचार करा - तुमच्या मुलांना त्याची किंमत चुकवावी लागेल. लेखामध्ये पुढे उपनगरामध्ये बंगला विकत घेण्याची पालकांची कृती मुले वयाने वाढल्यावर, कमावती झाल्यावर त्यांच्या उत्पन्नावर, व्यवसायाच्या संधीवर, आरोग्यावर कसा अनिष्ट परिणाम करते, हे एका स्टडी रिपोर्टच्या (अभ्यास अहवालाच्या) आधारे स्पष्ट केले आहे. 

लेख वाचल्यावर मला जाणवले की, या लेखामध्ये पालकांच्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम मुलांना भोगावे लागतात हा विचार मांडला आहे. यावर मी विचार करू लागलो. आपल्या मुलांना जे कांही भोगावे लागते मुख्यतः अहितकारक, त्याला खरंच कां पालक जबाबदार असतात ?   

मनांत उठलेल्या प्रश्नांचे उत्तर कांही अंशी तरी नक्कीच, माझ्या मनानेच दिले. पण त्या बरोबरच हेही सत्य आहे की कोणत्याही आई-वडिलांची आपल्याच मुलांना आपल्या चुकीच्या कृत्यांचा, वागणुकीचा त्रास व्हावा अशी इच्छा नसते. मी थोडासा विचारात पडलो. मुलांच्या जीवनासंबधी जे कांही अहितकारक आहे ते टाळता येईल कां? मनाने परत कौल दिला, निश्चितपणे येईल. पण त्यासाठी काय केले पाहिजे ? माझ्या मनाचे विचारचक्र फिरू लागले.  

वाईट किंवा अहितकारक जे घडते त्यामागे कांहीतरी कारण असते. षड्रीपु हे मोठे, पण त्याशिवाय न जाणवणारे अनेक ‘स्व-भावगुण’ सर्व माणसामध्ये त्याच्या नकळत असतात. त्यांचा परिणाम त्याच्या व्यवहारामध्ये, जीवनामध्ये दिसून येत असतो. कांही वेळेस मनुष्य जे कांही करत असतो, वागत असतो, ते चुकीचे आहे, अहितकारक आहे, त्याचा परिणाम मुलांच्यावर अनिष्ट होऊ शकेल, त्यातुन त्यांचे हित साधले जाणार नाही, हे त्याला माहितीही नसते, पण ‘स्व-भावगुणा’मुळे तो त्या करत राहतो, वागत राहतो आणि त्याचे फळ त्याला स्वतःला आणि त्याच्या मुलांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना सर्वांना भोगावे लागते.


बरं, याचा अर्थ असा नव्हे की माणसांची स्वतःला आणि मुलांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना दुष्परिणाम, अहितकारक परिणाम भोगावी लागणारी कृत्ये चोरी, दरोडा, मनुष्यहत्त्या, दहशतवाद, हिंसा या सारखी खुप मोठी दुष्कृत्ये असतात, उलटपक्षी ती अगदी सामान्य, नित्य नैमितिक, दैनंदिन जीवनातील कृत्ये, वागणे, प्रतिसाद असतात. 

आजचे संगणक, इंटरनेटचे युग प्रचंड धकाधकीचे, तीव्र स्पर्धेचे, धावपळीचे आहे. सर्वसामान्य व्यक्तींचे जीवन कामाच्या, व्यवसायाच्या ताणतणावाने, वादविवादाने, काळज्यांनी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ बनल्याने मेटाकुटीस आले आहे. 

आज बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी सिटीबस, लोकल-मेट्रो रेल्वेतून प्रवास करतात. हा प्रवास करतांना कोणत्या दिव्यातून जावे लागते हे ज्याच्या वंशा जावे त्यालाच समजते. त्यामुळे स्वतःची कार, किमान स्कुटर-मोटारसायकल असावी ज्यामुळे प्रवासाची दगदग कमी होईल, शरीराला थोडे सुख मिळेल अशी अपेक्षा करण्यात गैर कांहीच नाही. 

परंतु, वाहन घेतल्यावर वाहन चालवतांना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, वन-वे मधून वाहन दामटणे, वाहन तुफान वेगाने चालवणे, बाजुच्या वाहनाला अगदी रूग्णवाहिकेलाही बाजू न देणे, अगदी जवळ कुठे जायचे असले तरी कार-दुचाकी हवीच, अशी वृत्ती जोपासणे किंवा पोलीसांनी पकडल्यावर त्यांच्याशी हुज्जत घालणे, त्यांच्यावर दवाब आणणे, लाच देणे - गुर्मीत दंडाचे पैसे फेकणे, अशा पद्धतीचे वागणे, कृती मात्र निश्चीतपणे गैर आहेत. 

लहान मुले आपल्या आई-वडीलांना आदर्श मानत असतात. आपल्या आई-वडिलांचे असे गैर वागणे, कृती ते पाहातात, त्यातून शिकतात. पुढे ही मुले वयाने वाढल्यावर, स्वतः वाहन चालवू लागल्यावर, आपल्या आई-वडिलांसारखेच वागतात, ज्याचा अहितकारक परिणाम निश्चितपणे कधी ना कधीतरी त्यांना भोगावा लागतो.    

मुलांच्या जीवनावर वाईट परिणाम करणाऱ्या, त्यांचे अहित करणाऱ्या अशा किती तरी घटना आज आपल्याला बऱ्याच घरातून पाहायला मिळतात. उदाहरणार्थः आर्थिक व्यवहार करतांना अंथरूण पाहुन पाय पसरावे. हे पूर्णपणे विसरून अमाप खर्च करणे, कर्जाच्या पैशातून मोठे घर-फ्लॅट खरेदी करणे, कर्जाचे हप्ते थकले की प्रचंड उलाढाली करणे, तोंड चुकवणे, विरंगुळा किंवा करमणुक म्हणुन धुम्रपान-मद्यपान, पार्टी, मोठ्या हॉटेलमध्ये जेवण, रस्त्याच्या बाजूला गलिच्छ ठिकाणी उभे राहुन फास्टफुड खाणे, मोबाईल-टीव्ही-संगणक गेम्स खेळणे, फेसबुक-ट्वीटर- सोशल साईटसचा अतिरेक, रात्री जागरण, खेळ-व्यायामाचा अभाव, महागडे इंग्रजी माध्यमातील शिक्षण, कोचींग क्लासेस, लहान-सहान कारणांवरून वादावादी, हमरीतुमरीवर येणे, वृद्धांना मान न देणे, अबोला धरणे, त्यांना घरातील अडगळ-कटकट समजणे, तुसडी वागणुक देणे, पती-पत्नीतील भांडण, वाद, विभक्त राहणे, टोकाच्या वागणे..... 

अशा एक का दोन अनेक गोष्टी, घटना आज आपल्याला समाजात दिसत आहेत. सर्वच घरांमध्ये अशी स्थिती आहे असे नाही. परंतु ज्या घरामध्ये अशा कृती पालकांच्या कडून केल्या जात आहेत. त्या, त्या घरातीलच नव्हे तर इतर आजुबाजूच्या मुलांच्या मनावरही निश्चीतपणे वाईट परिणाम करतात. अशा घटनांचे दुष्परिणाम लगेच जाणवत नाहीत, समजत नाहीत पण होतात हे नक्की, कारण बी खुप लहान असते पण पुढे त्याचाच मोठा वृक्ष होतो हे सत्य आहे. 

माणुस म्हंटले की षड्रीपु, अहंकार, इर्षा, खोटे बोलणे, घृणा, असंयम, वैचारिक-वाणीची कठोरता, नैराश्य, आळस, हे सर्व असणार, पण त्याच बरोबर विनम्रता, प्रेम, खरे बोलणे, संयम, दया, करूणा, शांती, समंजसपणा, आशा, श्रद्धा, विश्वास, परोपकार, सहनशिलता, विवेक, चौकस बुद्धी, हे ही असणारच. त्यामुळे आपल्या मुलांचे, भावी पिढीचे जीवन चांगल्या संस्कारांनी घडवायची जी जबाबदारी मुख्यतः पालकांच्यावर असते आणि त्यामुळे त्यांनी, आपल्या कृतींचे, वागण्याचे आत्मपरिक्षण करणे, कोणत्याही कृतींचा अतिरेक टाळणे अत्यंत गरजेचे आहे.  

या सर्व विवेचनातून हे स्पष्ट होते की, पालकांच्या अनिष्ट कृतींचे परिणाम मुलांना भोगावे लागतात. हे जितके वास्तव आहे, तितकेच किंबहुना त्याहुनही जास्त, आपल्या इष्ट कृतीने, वागण्याने पालक मुलांचे जीवन घडवुही शकतात हेही त्रिकालाबाधित सत्य आहे. 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण