Sangli Samachar

The Janshakti News

म्हणून सांगतो बा पतंगा !... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १३ ऑगस्ट २०२४
शहरातील मोठ्या मैदानावर लोकांची बरीच गर्दी झाली होती. मकरसक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याच्या सोहळ्याचा आनंद लुटण्यास मैदानावर सर्वच वयोगटातील लोक आले होते. गर्दीमध्ये ऐंशी वर्षाच्या वृद्धापासून ते आपल्या आई-बाबांचा हात घरून, त्यांच्या कमरेवर बसून आलेली चिल्लीपिल्लीही होती. कांही लोक पतंग उडवण्यासाठी आले होते तर, कांही आकाशात डोलणारे पतंग पाहण्यासाठी आले होते.

तरूण-तरूणी, म्हातारे, बालके सर्वांचा उत्साह नुसता ओसांडून जात होता. सुपरमॅन, छोटा भीम, स्पायडरमॅन, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आकाराचे पतंग होते. कांही लोकांच्याकडे नेहमीचे चौकोनी, त्रिकोणी, चौरस आकाराचे पतंग होते. सर्व वातावरण उत्साहाने व स्फुर्तीने भरलेले होते. हे सर्व पाहून वा-यालाही जोर चढला आणि पतंग उडविण्याच्या सोहळ्यास सुरूवात झाली. थोड्याच वेळात लाल, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या, रंगीबेरंगी पतंग आकाशाचा ठाव घेऊ लागले. आकाश पतंग आणि पतंगांच्या लहरणा-या शेपट्यांनी सुशोभित होऊन गेले. 
“मस्त, छान, ब्रेव्हो, अरे हा छोटा भीम खूप उंच जात आहे, तो स्पॅयडरमॅन बघा कसा वरवर चढत आहे, अरे हा घोडा पाहा बैलाच्या पुढे कसा चाललाय .... हो हो” असे उद्गार व टाळ्या यांनी सर्व आसमंत भरून गेला. 


सर्व पतंग आपल्या शेपट्या फडकावत आकाशात डोलु लागले. पालक आपल्या बालकांना पतंगाची मजा दाखवत आपले वय विसरून स्वतःही एक लहान मूल झाले. मध्येच कांही पतंग कांहीतरी कारणाने दो-यापासून अलग होत जमिनीकडे झेपावत होते. अशा तुटलेल्या पतंगांना सोडणारे कांही क्षणांसाठी नाराज होत होते. पण, लगेचच दुस-या क्षणांला स्वतःला सावरून घेत होते. तुटलेले पतंग जमीनीकडे येत होते, नवीन पतंग त्यांची जागा घेत होते. आणि परत एकवेळ सर्वजण पतंग सोहळ्याची मजा लुटत होते. 

सर्व मैदान निख्खळ आनंदाच्या वातावरणाने असे ओसांडून जात असतांना, आकाशाच्या एका कोप-यातून एक भला मोठा पतंग हळूहळू वर चढत होता. त्याच्या तो भला मोठा आकार पाहून इतर पतंग त्याला जागा करून देत होते. जे त्याला जागा करून देत नव्हते, त्यांना तो सहज काटत होता. असे पतंग काटले की त्या मोठ्या पतंगाचे बळ आणखी वाढे आणि तो जास्तच जोराने वरती चढत असे. काटले गेलेल्या पतंगांना जमिनीकडे जाताना पाहून, आकाशातील अन्य पतंग आपले मित्र, सहचर, सोबती आपल्याला सोडून जात आहेत हे जाणून हळहळत होते. 

मोठ्या पतंगाचा तो अवाढव्य आकार इतर पतंगाच्या मनामध्ये धडकी भरवत होता. सर्वांच्या मनामध्ये त्या मोठ्याच्या कृत्यामुळे तिरस्कार उत्पन्न झाला होता. पण, त्याचा तो अवाढव्य आकार, त्याची अमाप शक्ति, त्याची वृत्ती पाहून सर्वजण मूग गिळून गप्प बसत होते. आणि त्याच्यापासून शक्य तेवढे दूर राहून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. 

आकाशामधील आनंद, उल्हास, एकोपाचे वातावरण बदलून त्याची जागा भयाने, दहशतीने घेतली गेली. ही अशी सर्व उलथापालथ चालू असली तरी त्या मोठ्या पतंगाला त्याचे कांहीच सोयरसुतक नव्हते. उलट सर्व पतंग आपल्याला घाबरत आहेत, हे पाहून त्याला आपल्या बलदंड शरीराचा, तुफान वेगाचा, अचाट ताकदीचा गर्व वाटू लागला. आपल्या वाटेस येणा-या सर्वांना तो एकामागून एकाला काटत चालला. आता तर त्याची ती उन्मत्त, क्रूर वागणुक, दुर्बळ पतंगापुरतीच मर्यादित राहिली नाही. चिमण्या, कबुतरे यांच्यासारखे लहानलहान निष्पाप पक्षीही त्याचे बळी होऊ लागले, कुणाचे पंख छाटले गेले तर कुणाचे गळे कापले गेले.
 
त्या अवाढव्य पतंगाला आवाहन देणारा, त्याला रोखणारा कुणीही आता आकाशामध्ये उरला नाही. पतंगाच्या मनातील अहंकार, गर्व, क्रूरतेची पातळी जशी चढत गेली तसे तो विसरून गेला, त्याचे शरीर दुस-या कुणीतरी तयार केलेले आहे, त्याचा जो वेग आहे तो त्याचा स्वतःचा नसून वाऱ्याचा आहे, त्याचे जे आकाशात डोलने चालू आहे त्याच्या मागे तो खरा कर्ता, करविता ज्यांने त्याला धाग्याच्या सहाय्याने, आपल्या कौशल्याने, आकाशात वर पाठविले आहे, तो आहे. आपल्याच नादात असलेला हा नादान पतंग हे पूर्णपणे विसरून गेला, की ज्या धाग्याच्या आधारावर तो वरती आला आहे तो मर्यादित आहे. आणि कधीतरी, कुठल्याही क्षणी तो आधार संपू शकतो. हे सर्व घडत होते, काळ पुढे चालला होता आणि अचानक, ......

अचानक कांहीतरी घडले. त्या मोठ्या पतंगाच्या मानेला प्रथम एक हिसका बसला. त्या हिसक्याने पतंग भानावर येतो न येतो तोच दुसरा, तिसरा ..... हिसक्यावर हिसके बसू लागले. त्याच्या भव्य, अवाढव्य शरीराचा आधार असलेले त्याचे अवयव मध्येच मोडले गेले. त्याचा तोल संभाळणारे शेपुट तुटून कुठेतरी घरंगळत गेले. त्याचा पोशाखाला मोठी मोठी छिद्रे पडून तो विद्रुप दिसू लागला. काय करावे, ही सर्व पडझड कशी थांबवावी हे मोठ्या पतंगाला कांही समजेना. 

आता त्या भव्य पतंगाला समजुन चुकले, आपले शरीर, आपली शक्ति, आपला वेग, यामध्ये आपले स्वतःचे असे कांहीच कर्तृत्व नाही. आपले हे असे वरवर जाणे, सर्व आकाशभर पसरायला लागणे, हे जे कांही घडले त्या मागील कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, ज्याला आजवर आपण जाणलेच नाही. आपल्या विचारांचा, अविवेकी कृत्यांचा आता मोठ्या पतंगाला पश्चाताप होऊ लागला. 

पण आता वेळ टळून गेली होती. परत एकवेळ खूप जोराचा हिसका पतंगाच्या मानेला बसला अन् त्याचे ते दुबळे, मोडलेल्या अवयवांचे, पोशाखाच्या चिंध्या झालेले शरीर धाग्यापासून अलग झाले, हवेच्या झोक्यावर हिंदकळत कसेबसे दिशाहिनपणे वेगाने खाली येऊ लागले. मोठा पतंग छिन्न-भिन्न स्थितीत खाली खाली आला आणि झाडाच्या फांदीला थटून अडकून बसला. आता ना त्याच्याकडे कुणी पाहात होते ना कुणाला त्याचे भय होते, ना तो परत एकवेळ आकाशात जाऊ शकणार होता. त्याचा अहंकार, गर्व, कर्तृत्व, भव्यदिव्य शरीर, अफाट वेग सर्व-सर्व कांही आता संपले होते. आता तो असाच अधांतरी लटकणार होता, कुठवर हे कुणालाच माहिती नाही. 

तो मोठा पतंग आला व गेला, कांहीच उरले नाही. आकाशामध्ये अनेक लहानसहान, मोठे पतंग येतच राहिले, आकाश भरून वाहतच राहिले. घागा कापला गेलेले पतंग जमीनीवर कोसळत राहिले, नवीन पतंग त्यांची जागा घेत राहिले आणि एक रहाटगाडगे अखंडपणे वरती जात होते, खालती येत होते, जीवनचक्र सुरू होते. 
हे सर्व पाहतांना मला जाणवले*,

आकाशी वरवर गेला पतंग अचानक तुटला । 
पाहता पाहता भरकटत झाडावर येऊन अडकला ।। १ ।। 
वेळ सिमीत असतो आकाशी राहण्याचा ।
लांबी धाग्याची ठरवी वेळ लहरण्याचा ।।२।।
धाग्याचे टोक असते हाती दुसऱ्याच्या ।
जाणे उंच लहरीवर ठरते वाऱ्याच्या ।।३।।
लोभसवाणे आकार जरी असते पतंगाचे ।
काड्या खळीने बनले आहे अंग त्याचे ।।४।।
रंग-रूप, उंच जाणे पराधिन आहे सर्व कांही ।
पण पतंगाला वास्तव कांही उमजत नाही।।५।। 
म्हणूनी सांगतो बा पतंगा अजूनही आहे वेळ ।
नकोस दवडु वेळ जवळ येईल कधीही काळ ।।६।।
सोडून दे रूप देह अहंकार, जात-पातीचा ।
ना उपयोग त्या वेळी सन्मान अन् संपत्तीचा।।७।।
ने तुझला सदा प्रभु चरणी काया वाचा मने ।
शेवटचा दिस होईल गोड सत्य हे समजण्याने ।।८।। 
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण