| सांगली समाचार वृत्त |
जळगाव - दि. १२ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या विविध भागाचा दौरा करीत आहेत. जनतेशी संवाद आणि लोकांच्या गाठीभेटी या माध्यमातून अजित पवार यांनी एक प्रकारे प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्याभोवती नेहमीप्रमाणेच गर्दी जमत आहे. परंतु गुप्तचर विभागाने अजितदादांना या गर्दीपासून विशेषतः महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असून त्यांच्या जीवितस धोका असल्याचे म्हटले आहे.
गुप्तचर विभागाच्या सल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजले असून, ही माहिती खुद्द अजित पवार यांनीच एका कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांना दिली. . विशेषतः मालेगाव आणि धुळे या ठिकाणी मला जीवितास धोका असल्याचा गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली आहे. परंतु राज्यातील भगिनींनी मला राख्या बांधल्या आहेत, आणि जोपर्यंत या हातावर राख्या आहेत तोपर्यंत मला कुठलीही भीती नाही, कुठल्याही संरक्षणाची गरज नाही, राखीचे सुरक्षा कवच सहज माझ्या भोवती प्रेमाची ढाल बनून माझे संरक्षण करेल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही गरीब महिलांसाठी योजना आणतो आहोत मात्र विरोधक विरोधासाठी विरोध करीत आहेत. ते सरकारमध्ये असताना अशा योजना आणण्यासाठी त्यांना कोणी अडवलं होतं असा सवाल त्यांनी केला. अनेक वेळा मार्ग भरताना समस्या आल्या. मात्र वयाची अट असेल, अपूर्ण कागदपत्र असतील, याच्या अडचणी आल्या. पण आपण त्या सोडवल्या. आता 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आपण भावाच्या नात्याने आम्हाला राख्या बांधता, हा भाऊ आपला आधारवड बनेल. आम्ही दिलेला शब्द पाळण्याचे काम करतो. तुम्ही जो बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे, त्यावर येत्या 17 तारखेला पैसे येतील जी पात्र महिला आहे त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहेच, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.