| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ ऑगस्ट २०२४
समलिंगी संबंध हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील चर्चेचा विषय. यासाठी अनेकांनी लढा उभारला. प्रकरण न्यायालयातही गेले. आता अनेक देशात उघडपणे या समलिंगी संबंधाला मान्यता देण्यात आली आहे. आणि याच समलिंगी व्यक्तींची बाजू ज्याने मोठ्या ताकतीने न्यायालयात मांडली त्या अनिश गावंडे या 27 वर्षीय कार्यकर्त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदे नियुक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारतातील समलिंगी, ट्रान्सजेंडर्स समूहाला आजही वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. गावंडे यांची नियुक्ती हा भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे कारण म्हणजे ते भारतातील राजकीय पक्षात इतके महत्त्वाचे पद भूषवणारे पहिले समलिंगी व्यक्ती ठरले आहेत.
अनिश गावंडे या तरुणाला राजकीय, सामाजिक, आणि ऐतिहासिक वर्षाचे पार्श्वभूमी आहे. अनिश गावंडे यांचे आजोबा टी. के. टोपे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत भारताच्या संविधानाचा मसूदा तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रभावानेच याने कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले आहे गावंडे यांनी बौद्धिक इतिहास आणि सार्वजनिक धोरण या विषयात प्राविण्य मिळवले आहे.
राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून गावंडे यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ज्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे प्रतिनिधित्व करणे, पक्षासाठी जाहीरनामा आणि निवडणूक रणनीती तयार करणे, यांसह प्रमुख मुद्द्यांवर शीर्ष नेतृत्वाची मते सामायिक करणे यांसारख्या कामाचा समावेश आहे. गावंडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांचा हा प्रवास प्रवाहाबाहेरील अनेक तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरीत कलेल. त्यांचा निर्णय हेच दर्शवितो की, खुलेपणाने समलिंगी असणे आणि राजकारणात सहभागी होणे शक्य आहे.