yuva MAharashtra हिंडेनबर्ग अहवालाचा शेअर बाजारावरील परिणामाबाबत तज्ञांचा मौलिक सल्ला !

हिंडेनबर्ग अहवालाचा शेअर बाजारावरील परिणामाबाबत तज्ञांचा मौलिक सल्ला !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर खळबळजनक आरोप त्यानंतर शेअर बाजारात हडबड माजली होती. मागील वेळेप्रमाणेच याही वेळी शेअर बाजार कोसळणार का ? त्याचा गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होणार का ? होणारे नुकसान किती असेल ? अशा अनेक प्रश्नांची जंत्री मांडली गेली. परंतु यातील तज्ञांनी या साऱ्या घडामोडीचा शेअर बाजारावर आणि गुंतवणूकदारांवर मागील वेळेप्रमाणे फार मोठा परिणाम होईल का ? याबाबत मौलिक सल्ला दिला आहे. 

अदानी ग्रुपतर्फे महत्वाचा खुलासा

दरम्यान अदानी ग्रुपने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला असून, हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे 'साप समजून भुई बडवण्याचा प्रकार' असल्याचे म्हटले आहे. या अहवालात करण्यात आलेले आरोप बिन बुडाचे असून, जुन्या दाव्यांचा पुनर्वापर आहे. सुप्रीम कोर्टाने जानेवारी 2024 मध्येच हे आरोप पूर्णपणे फेटाळलेले आहेत. या अहवालात माधवी पुरी बुच यांचे नाव गोवण्यात आले असले तरी, त्यांचा आणि अदानी ग्रुपचा कोणताही संबंध नाही.


भारताच्या वेगाने वाढणाऱ्या आर्थिक प्रगतीचा ज्या देशांचा पोटशुळ कुठला आहे, त्यांनीच हिंडेनबर्गला हाताशी धरून भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी रचलेले हे षडयंत्र असल्याचे अदानी ग्रुपच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

शेअर बाजारातल्या व्यवहारांवर काय परिणाम होणार? 

शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते गेल्या वेळी जसा शेअर बाजार पडला तसा परिणाम होणार नाही. हिंडेनबर्गच्या अहवालाचा थोडाफार परिणाम दिसेल, मात्र मोठा फरक पडणार नाही. अल्पावधीसाठी शेअर बाजारावर परिणाम दिसेल. मात्र मोठी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे. हिंडेनबर्गने फक्त आरोप केले आहेत, ते अजून सिद्ध झालेले नाहीत.. त्यामुळे बाजारात शेअर विक्रीची शक्यता कमी आहे. मात्र, बाजाराचा मूड पाहूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली तर गुंतवणूकदारांना चांगली संधी मिळेल आणि त्यांना चांगला नफा मिळू शकेल असाही काही विश्लेषकांचा अंदाज आहे.