Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्राची भूमिकन्या सीता अशोक शेळकेने केरळच्या वायनाडमध्ये केला भीम पराक्रम !


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ४ ऑगस्ट २०२४
अनेक प्रसंगातून, वेगवेगळ्या कारणामुळे नारीशक्तीचे चर्चा नेहमीच होत असते. अगदी स्वयंपाक घर सांभाळण्यापासून ते आकाश जल आणि भूमी या तिन्ही क्षेत्रात नारीशक्तीने गाजवलेले पराक्रम नेहमीच कौतुकाचा विषय ठरतात. रामायणातील जनक कन्या सीतेला भूकन्या म्हणूनही संबोधले जाते. तिची कथा आपल्यासाठी नवी नाही, पण आधुनिक काळातील भूमिकन्या म्हणून अहमदनगरच्या भीम पराक्रम केला असून, संपूर्ण केरळमध्ये तिच्याच नावाची चर्चा आहे.

राहुल गांधी यांच्यामुळे चर्चेत आलेले केरळमधील वायनाड हे सध्या एका रात्रीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीने मृत्यू तांडवामुळे वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. येथील झालेल्या भूस्खलनामुळे तब्बल चार गावं गाडली गेली. कैक कुटुंब उध्वस्त झाली. आणि या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून गेली ती महाराष्ट्र भूमिकन्या सीता अशोक शेळके...

मेजर सीता शेळके आणि त्यांच्या तुकडीनं वायनाडमध्ये प्रभावित क्षेत्राला जोडणाला पूल अवघ्या 16 तासांमध्ये उभारला. वायनाडमध्ये भूस्खलन प्रभावित क्षेत्रामध्ये कैक आव्हानं असतानाही मेजर शेळके आणि त्यांच्या तुकडीनं उपलब्ध वेळ आणि साहित्यात पूल बांधणीचं काम पूर्णत्वास नेत बचावकार्याला आणखी वेग दिला आणि त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण तुकडीवर देशवासियांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


मेजर सीता अशोक शेळके या मुळच्या महाराष्ट्रातील अहमदनगरच्या. सध्याच्या घडीला वायनाडमध्ये सेवा देणाऱ्या भारतीय लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील 70 जणांच्या तुकडीतील त्या एकमेव महिला अधिकारी.

मद्रास सॅपर्स ही लष्कराची अशी तुकडी आहे, जी युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुल बांधणी आणि तत्सम कार्याच्या माध्यमातून सैन्यासाठी वाट मोकळी करून देत लँडमाईन निष्क्रिय करण्यामध्ये या दलाची मोठी भूमिका असते. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी लष्कराची ही तुकडी बचावकार्यात सिंहाचा वाटा घेताना दिसते. केरळातील 2018 मधील महापुरावेळीसुद्धा या तुकडीनं मदतीचा हात दिला होता.