Sangli Samachar

The Janshakti News

नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी चालवते मेट्रो ! पिकाबरोबरच बापाचा जीव ही फुलतोय !


| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. १४ ऑगस्ट २०२४
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष साध्य करता येते. यासाठी मोठा वारसा असलाच पाहिजे असे नाही. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रसिका संजय तेरवाडे हे नाव कालपर्यंत कुणालाही माहीत नव्हते. पण आज या नावाने फक्त स्वतःचंच नव्हे, तर आपल्या कुटुंबाचं आणि अख्ख्या गावाचं नाव मोठ्ठं केलं. सामान्य शेतकरी कुटुंबातील या भूमिकन्येने कोणतेही पाठबळ नसताना स्वबळावर मेट्रोच्या पायलट पदापर्यंत मजल मारली आहे त्यामुळे शेतात नांगर चालवणारा एका शेतकऱ्याची मुलगी रसिका ही पहिली मेट्रो चालक ठरली आहे.

रसिका हिचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण आश्रम शाळा तेरवाड या ठिकाणी झाले आहे. त्यानंतर तिने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील चिमासाहेब जगदाळे कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण केला व शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिग्री चा अभ्यास सुरू केला. डिग्री पूर्ण करून तिने महावितरण कंपनीत अप्रेंटिस म्हणून प्रमाणपत्र घेतले. हे करीत असताना रेल्वे भरतीचा अभ्यास सुरू ठेवला होता, यातूनच तिची स्टेशन कंट्रोलर म्हणून पुणे मेट्रो मध्ये निवड झाली. पण एवढ्यावरच न थांबता रसिकाने ट्रेन ऑपरेटर पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, थेट मेट्रो पायलेट म्हणून भरारी घेतली.


या साऱ्या प्रवासात तिचे वडील संजय तेरवाडे व आई शारदा तेरवाडे यांचे मोठे योगदान लाभले आहे. कुटुंबीय पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात. शेतातून मिळणारे उत्पन्नावरच ते आपला उदरनिर्वाह चालवतात. पण तेरवाडी कुटुंबीयांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणापासून रोखले नाही. त्यांचे सर्वच मुले मुले उच्च शिक्षण घेत आहेत.

रसिकाला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. या प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत तिने उच्च शिक्षण घेऊन, आपली परिस्थिती सुधारण्यासाठी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आपल्या मळ्यातील वस्तीपासून सुमारे तीन किलोमीटर पायपीट करीत, तेथून बसने प्रवास करीत सात वर्षे उच्च शिक्षणाचे ध्येय गाठले. वरील संजय तेरवाडे यांनीही तिला कशाचीही कमतरता न भासू देता, उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले. या सर्व कष्टाची जाणीव रसिकांनी राखत थेट भारतीय रेल्वे खात्याच्या उच्च पदापर्यंत कोणत्याही आरक्षणाच्या गवसणी घातली आहे. 

रसिकाच्या नेत्र दीपक प्रगतीचा आदर्श समाजातील सर्व तरुण-तरुणींनी घेण्याचे आवश्यकता आहे. रसिकाच्या रुपाने नांगरट करणाऱ्या एका शेतकऱ्याची मुलगी मेट्रो पायलट बनली आहे. सध्या रसिकाचा बोलबला संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभर घुमतो आहे.