| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १४ ऑगस्ट २०२४
गेली काही दिवस होणार, होणार म्हणून गाजत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा धूमधडाका दिवाळीनंतर होण्याचे संकेत असून ऑक्टोंबरच्या मध्याला आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची विधानसभांची मदत जवळ कालावधीत संपत असल्याने या दोन्ही राज्यांचे निवडणूक एकत्र घोषित केले जाते. त्यामुळे दोन्ही राज्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला, तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यात केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणा राज्याची मदतीपूर्वी निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सणासुदीच्या काळात निवडणुका घेऊ नयेत असा संकेत आहे. राज्यात 28 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान दिवाळी सण आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणुका घेण्यात येऊ नयेत. तसेच मुदतीपूर्वी निवडणुका घेऊन राज्य सरकारवर अन्याय करू नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला सदर निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्राने दिली आहे. त्यामुळे एकूण शक्यता पाहता निवडणुकांचा धूमधडाका दिवाळीनंतरच सुरू होणारा असून आरोप प्रत्यारोपाचे फटके फुटणे असे सुरू होईल, असे या सूत्राने सांगितले.