Sangli Samachar

The Janshakti News

विश्वाची उत्पत्ती... शोध... कांही विचार... - (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १६ ऑगस्ट २०२४
पृथ्वीपासून लाखो प्रकाश मैल दूर असलेल्या नव्या ग्रहाचा शोध !...

या ग्रहावर मानवनिर्मित यान पोहचले !...

अमुक तमुक इतके लोक भूकबळीचे शिकार, बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू !...

पृथ्वीमध्ये दडलेले आश्चर्य उलगडले !...

प्रसार माध्यमातून नेहमी प्रसिद्ध होत असलेल्या ठळक बातम्यांची ही कांही शिर्षके... अशा मजकुरांच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या की मनांमध्ये कांही प्रश्न उद्भवतात. 

एकीकडे पृथ्वीवर जीवंत असलेल्या माणसांच्या मूलभूत गरजा पुरवल्या जात नसतांना, या दूरस्थ ग्रहांची, विश्वाची उत्पत्ती यासारख्या बाबींचा शोध कशासाठी घ्यायचा ? लाखो-करोडोंची रक्कम यावर कशासाठी खर्च करायची ? काय मिळणार आहे हे समजाऊन घेऊन ? ही माहिती मिळाल्यानंतर सर्व मानव सुखी, आनंदी होणार आहेत कां, जगातील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत कां?...

बरं असेही नाही की आजवर घेतलेल्या शोधाचे निष्कर्ष परिपुर्ण आहेत. कांही खगोल शास्त्रज्ञांनी महास्फोटामुळे या विश्वाची उत्पत्ती झाली असा दावा केला की, दुसरी शास्त्रज्ञ मंडळी सांगतात स्फोट होण्यासाठी कांही कारण लागते, कशाचा तरी कशाशी तरी संयोग व्हावा लागतो, किंवा कशाचे तरी विघटन व्हावे लागते. त्यामुळे स्फोटातून जर विश्वाची निर्मिती झाली असेल, तर तिथे आधीच कांही तरी असणार. ते काय होते, ज्याच्या कारणे किंवा संयोगाने किंवा विघटनाने हा स्फोट झाला ? 


परस्पर विरोधी अशा बातम्या वाचल्या की माझ्या सारखा सामान्य, नेहमीप्रमाणे गोंधळात. त्याला समजत नाही, खरंच ते काय होते, आहे, आणि असेल...
खरंच का नाही त्याला आदि
खरंच का नाही त्याला अंत
पण ते जे कांही आहे ते आहे निश्चित |
अजूनही अज्ञात, असीम, अनंत ॥

यावर आता एक महत्वाचा प्रश्न, या अफाट, अथांग विश्वातील पृथ्वी नांवाच्या या लहान ग्रहावरील लहानशा जीवाला, मानवाला कशासाठी या अज्ञाताचा शोध घ्यायचा आहे ? 
त्याला असे वाटते कां, की एकदा कां त्या अज्ञाताचे, रहस्य उलगडले कि, त्याच्याच प्रमाणे आपणही असीम, चिरंतन, अमर होऊ?

कांही क्षणांसाठी गृहीत धरू ही सर्व अज्ञात रहस्ये मानवाला उलगडली, काय होईल या नंतर ? 
या रहस्य उद्घटनाचा उपयोग सर्व मानव जातीच्या हितासाठी असेल की कांही मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी असेल ? 
या रहस्य भेदाचा उपयोग कांही निवडक लोकांनी आपल्या सुखसोयीसाठी, अस्तित्व, तारूण्य, जीवन अनंतकाळ राहण्यासाठी जर केला तर, त्यांच्यातील खरा माणूस नष्ट होईल कां, संपेल कां ? आणि नंतर जे कांही उरेल ते सर्वांच्या सर्व नाशाला कारणीभुत होईल कां ?

मानवाचा आजवरचा इतिहास, लढाया, युद्धे, शस्त्रे, बॉम्ब व स्वार्थ, हेवेदावे, द्वेष हे सर्व लक्षात घेता असे वाटते की मानवाने विश्वातील रहस्यांचा, विश्वाच्या उत्पतीचा, त्या अज्ञाताचा शोध घेण्याचा, त्याला जाणण्याचा प्रयत्न जरूर करावा आणि, या सर्व रहस्यांचा उलगडा झाल्यानंतर त्याचा वापर सर्व मानव जातीच्या हितासाठी करावा. पण कोणत्याही कारणाने याचा वापर सर्वांच्या हितासाठी करणे शक्य नसेल, तर ही रहस्ये रहस्यच राहू द्यावीत, स्पष्ट करू नयेत. जाहीर करू नयेत. मर्यादित ठेवावीत आणि ज्यांना ती ज्ञात झाले असतील त्यांनी त्यांच्या मृत्यू बरोबर ती आपल्या सोबत घेऊन जावीत. 

आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण