yuva MAharashtra 'लाडक्या बहिणीं'मुळे बँकिंग क्षेत्रातील भाऊ संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार !

'लाडक्या बहिणीं'मुळे बँकिंग क्षेत्रातील भाऊ संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ला महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जवळपास दीड कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळणार असून, यापैकी काही महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वीच तीन हजार रुपयांचे 'मुख्यमंत्री भावाची' भाऊबीज पोहोचली. परंतु यामुळे 'बँकिंग क्षेत्रातील भाऊ' मात्र संतापले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. 

अर्जातील काही त्रुटीमुळे अनेक बहिणींच्या खात्यावर या योजनेतील पैसे जमा होऊ शकले नाहीत. यामध्ये बँकेचा कोणताही दोष नसताना, त्यांना या बहिणींच्या संतापाला तोंड देताना नाकेनऊ येत आहेत. रोजच्या व्यवहारापेक्षा या बहिणींच्या प्रश्नांच्या सरबतीने हैराण झालेले बँकिंग क्षेत्रातील भावांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच पत्राद्वारे आपले . गाऱ्हाणे मांडले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँकेत ज्यांचे खाते नाही, अशा महिलांची गर्दी अचानक वाढल्याने, नियमित बँकिंग कामावर याचा परिणाम होत असल्याची तक्रार बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

आधीच ही योजना अनेक कारणामुळे रखडली होती. तशात पुण्यातील एका जमीन व्यवहारात नुकसान भरपाई न दिल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने ही योजनाच थांबवण्याचा इशारा दिला होता. सुरुवातीला योजनेतील त्रुटी, त्यानंतर अशिक्षित महिलांची अर्ज भरण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळणारा थंडा प्रतिसाद या साऱ्या कारणामुळे महिलावर्ग नाराज होत होता. ही योजना अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बँकेपर्यंत पोहोचली. आता बँकेतील अडचणींमुळे एका नव्या समस्येला या महिलांसह बँकिंग कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बँकेचे वेगवेगळे चार्जेस, मिनिमम बॅलन्स या कारणामुळे ज्या महिलांच्या खात्यावरील रक्कम कमी झाली, त्या महिलांनी तर बँक कर्मचाऱ्यांशी उभा दावा मांडला. एकीकडे नियमित ग्राहकांची वर्दळ तर दुसरीकडे या महिलांचे गर्दी आणि त्यांच्या शंका यामुळे बँकेतील कर्मचारी वैतागले आहेत. आता मुख्यमंत्री या साऱ्यातून कसा मार्ग काढतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.