Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीची कृष्णेतील पूर पातळी पुन्हा वाढू लागली, नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाण्याचे महापालिकेतर्फे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
गेले दोन दिवस सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण व नदीचे पाणलोट क्षेत्रात कोसळदार बरसणाऱ्या पावसाने गेले दोन दिवस विश्रांती घेतल्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीतील पूर पातळी स्थिर होती. कृष्णेची पूर पातळी तर 40 फुटावरून 38 फुटापर्यंत खाली आली होती. परंतु कालपासून धरण क्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. कोयना व वारणेसह राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने या भागातील सर्वच नदीकाठच्या नागरिकांची पुन्हा एकदा धडधड वाढू लागली आहे. 

सांगली येथील आयर्विन पुलाजवळील कृष्णेची पूर पाणी पातळी 38 फुटावर आल्यानंतर काकानगर आदी भागातील काही नागरिक स्वगृही परतले होते. परंतु पुन्हा एकदा त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा नदीची पाणी पातळी वेगाने धोका पातळीकडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

या पार्श्वभूमीवर काल सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती आणि कोल्हापूर येथील अंकुश संघटना यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे अलमट्टीतून चार लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याबाबत आणि सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पाटबंधारे अधिकारी तसेच हिप्परगी व अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांची समन्वय साधण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. अलमट्टीतून सध्या साडेतीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून, सातारा सांगली कोल्हापूर भागातील या आठवड्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील नद्यांचे पाणी वेगाने वाढून नागरी वस्तीत शिरण्याचा धोका आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त हवे होऊ शकते. म्हणून कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या शासन-प्रशासनाने काळजी घेण्याची गरज या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.