| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
अगदी सराईतपणे बंद घरांना लक्ष करून घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची किमया सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आहेत. यापैकी तौफिक सिकंदर जमादार (वय 31, रा. उमळवाड, ता. शिरोळ), समीर धोंडीबा मुलाणी (वय 31, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) आणि दीपक पितांबर कांबळे (वय 27, रा. उमळवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सांगली आणि परिसरात चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी, सर्वत्र गस्त वाढवण्याची व गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील पोलीस अधिकारी अधिक सतर्क झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही ॲक्शन मोडवर आला होता. अशातच तीन तरुण हरिपूर परिसरात चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची खबर, अन्वेषण विभागाच्या पोलिस अंमलदार संदीप नलावडे, हवालदार अरुण पाटील यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता. यावेळी हरिपूर येथील जुना रस्ता भागात तिघेजण एम एच 9 ई-एच 711 0 या क्रमांकाच्या दुचाकीवरून चोरीचे सोने आणि चांदीचे दागिने घेऊन थांबले असल्याचे लक्षात आले. त्यांना पळून न जाण्याची संधी देता ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांनी दुचाकीला अडकवलेल्या पिशवीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा खजिनाच सापडला. सदर तरुणांकडे अधिक चौकशी करता तौफिक जमादार याने समीर मुलाणी आणि दीपक कांबळे यांच्या सोबतीने हरिपूर परिसरात सहा महिन्यात बंद घरांचे कडेकोयंडे उचकटून चोऱ्या केल्याचे कबुली दिली. त्याचबरोबर चार दिवसापूर्वी वारणा मध्ये चोरी केल्याचेही सांगितले. सांगली प्रमाणेच सातारा जिल्ह्यातही दरोड्याचा गुन्हा केल्याचे त्याने मान्य केले.
या तिघांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पाच, संजय नगर पोलीस ठाण्याकडील एक आणि शिरोळ पोलीस ठाण्याकडून एक अशा सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस अंमलदार दरिबा बंडगर, सागर लवटे, अरुण पाटील, अमर नरळे, सुशील मस्के, सुरेश थोरात, योगेश पाटील, शहर पोलीस ठाण्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे यांचा समावेश होता. दरम्यान अल्पावधीतच सांगली शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे या सर्वांचे नागरिकतून कौतुक होत आहे.