yuva MAharashtra 'तर...' तोंडाला चव आणणारे मीठ तुमच्यासाठी ठरू शकते जीव घेणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याने सर्वत्र खळबळ !

'तर...' तोंडाला चव आणणारे मीठ तुमच्यासाठी ठरू शकते जीव घेणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याने सर्वत्र खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ ऑगस्ट २०२४
मिठाशिवाय कोणतेही अन्न बेचव लागते. पंगतीतील ताटाला मीठ हवेच. परंतु याच मिठाचे प्रमाण अधिक झाले, तर आपले तोंड वेडेवाकडे होते. म्हणून जेवणात असो किंवा कुठल्याही खाद्यपदार्थ मिठाचे प्रमाण योग्यच असायला हवे. मात्र आता तुमच्या खाद्यपदार्थात प्रमाणाबाहेर मीठ असेल तर ते तुमच्यासाठी जीवघेणे ठरू शकते, असा इशारा (WHO) जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगभरात जवळपास 19 लाख नागरिक मिठाच्या अधिक सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. WHO च्या एका ताज्या अहवालामध्ये मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे याचा उल्लेख केला आहे. या अहवालानुसार केवळ तीन टक्के लोकच मिठाचे योग्य प्रमाणात सेवन करीत आहेत. उर्वरित लोकांच्या अधिक प्रमाणात मीठ खाण्याच्या सवयी घातक ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


WHO च्या अहवालानुसार आपल्या आहारात केवळ पाच ग्रॅम मिठाचा समावेश असायला हवा. परंतु सध्या जगातील प्रत्येक व्यक्ती 10.8 ग्रॅम इतके मीठ सेवन करीत आहे. WHO च्या अहवालानुसार 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खायला हवे तर लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण याहीपेक्षा कमी हवे.

आपल्या पोटात सर्वाधिक मीठ जाते ते चिप्स किंवा अशाच प्रकारच्या पॅक बंद पदार्थातून. या पाकिटावर मिठाचे प्रमाण लिहिणे आवश्यक आहे. पण तो नियमानुसार ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. त्यामुळे नागरिकांना या खाद्यपदार्थातून आपल्या पोटामध्ये किती मीठ जाते याचा अंदाज येत नाही. WHO च्या म्हणण्यानुसार मीठ एक ॲडिक्टिव्ह अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. अनेकांना चटपटीत खाण्याची सवय असते, ही सवय जोपासण्यासाठी अधिक प्रमाणात मीठ वापरले जाते, परंतु याच धारणेनुसार बाजारात असलेल्या पाकीट बंद पदार्थांमध्ये प्रमाणाबाहेर मिठाचा वापर केलेला असतो. जे आपल्या शरीरासाठी घातक आहे. 

भारताला मिळाले असे रेटिंग :
या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर १ ते ४ दरम्यान आहे. १ असणे म्हणजे सर्वात कमी आणि ४ म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. १ मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. २ स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे त्याबाबत भारताचा स्कोर हा दोन आहे. ३ स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ४ स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले आहेत. याचा फायदा नक्कीच अखिल मानव जातीस होऊ शकतो.

आणि म्हणूनच आपल्याला शतायुषी व्हायचे असेल तर यापुढे मिठाचे योग्य प्रमाणात आहार घेणे हीच आपली सवय बनवली गेली पाहिजे.