| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ४ ऑगस्ट २०२४
ढगफुटी सारखा किंवा अतितीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना, निव्वळ सरकारी अनास्थामुळे यावर्षी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले व नागरिक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. म्हणून आज कृष्णा पंचगंगा संगम घाटावर दोन्ही सरकारांचे श्राद्ध घालण्यात आले.
गेले दहा दिवस शिरोळ तालुक्यात महापुराचे पाणी साचून राहिलेले आहे. या महापुराचे पाणी उतरावे म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. सरकारने आणलेल्या या महापुराने तालुक्यातील नदीकाठच्या जनता भयभीत झालेली आहे. अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले. पण नागरिकांच्या खाण्यापिण्याची, किंवा जनावराच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणती सोय सरकारने आणि प्रशासनाने केलेले नाही. याकरिता आज त्यांचा निषेध म्हणून दोन्ही संघटनांच्या वतीने श्राद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आले. आजचे हे निषेध आंदोलन करताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाने बोंब ठोकून नदीला नैवेद्य वाहण्यात आला.
सरकार, कोल्हापूर-सांगलीचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य चुकामुळे महापुराचा यावर्षी शिरोळ तालुक्याला फटका बसला आहे. आणि या पुराचे पाणी अनेक दिवस उतरले नसल्याने, आपला जीव धोक्यात घालून कामे करू लागल्याने अकिवाट मधील दुर्घटना घडलेली आहे. याला सर्वस्वी प्रशासकीय दुरावस्था कारणीभूत असून या घटनेचा निषेध करून त्यामध्ये दगावलेल्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कृष्णा महापूर समितीचे विजयकुमार दिवाण, सर्जेराव पाटील, सुयोग हावळ, प्रदीप वायचळ, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, बाळासाहेब सोमन, आप्पासो कदम, सोमनाथ तेली, सुरेश गोंधळे यांच्यासह कुरुंदवाड मधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.