| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. मराठवाडा, विदर्भ, कोकणासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आज बुधवारी देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अलर्ट
आजपासून पुढील तीन-चार दिवस राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या दक्षिण बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून येत्या 24 तासांत ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे रायलसिमा आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
याशिवाय वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.