| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले नेतृत्व, दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ, शिक्षण क्षेत्रात नवीन पिढी घडवण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचे अवलंब करणारे दूरदृष्टी लाभलेले शिक्षणप्रेमी आणि स्वदेशी फार्माच्या माध्यमातून औषध क्षेत्रात स्वतःचे आगळे वेगळे स्थान करणारे उद्योग म्हणून ज्यांचा नावलौकिक त्रिखंडात गाजतो आहे, ब्राम्हनाळ व सांगलीचे सुपुत्र रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा आज वाढदिवस.
सांगली जिल्ह्यातील ब्राह्मनाळसारख्या छोट्याशा गावातून सांगली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी छोटीशी औषध कंपनी सुरू केलेल्या रावसाहेब पाटील यांनी अल्पावधीत स्वदेशी फार्माच्या माध्यमातून स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. औषध विक्रेत्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी सांगली केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक औषध विक्रेत्यांना न्याय मिळवून दिला. जिल्हा पातळी पासून राज्य व देश पातळीपर्यंत त्यांनी यासाठी लढा दिला. आजही ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
उच्च परंपरा असलेल्या जैन धर्मातील धर्माभिमानी माता-पितांचे संस्कार घेऊन, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समाजासाठी त्यांनी केलेली आर्थिक मदत त्याला धर्माभिमानी व दानशूर म्हणून नावलौकिक मिळालेल्या रावसाहेब पाटील यांना दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमनपद मिळाल्यानंतर, या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. जैन समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.
औषध क्षेत्रात कार्यरत असताना गरज लक्षात घेऊन त्यांनी यासाठी महाविद्यालय सुरू करून, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. यासाठी त्यांचे योगदान अलौकिक मानले जाते.
एकीकडे अनेक पतसंस्था डबघाईला आलेल्या असतानाच कर्मवीर नागरिक पतसंस्थेची धुरा त्यांच्या हाती आल्यानंतर, या पतसंस्थेला तर एक नवी उभारी दिलीच पण अनेक मध्यमवर्गीय व गोरगरिबांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सबल बनवण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ठेवीदारांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच आज पतसंस्थेच्या ठेवी कोटीकोटीची उड्डाणे घेत आहेत.
अशा या दानशूर, धर्माभिमानी शिक्षण व सहकार प्रेमी उच्च व्यक्तिमत्वास सांगली समाचार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !