| सांगली समाचार वृत्त |
कराड - दि. ४ ऑगस्ट २०२४
महामार्गाची दुरवस्था, खड्ड्यातून वाहन चालविताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात हल्लाबोल केला. पुणे-बेंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले.
‘टोल नाही-टोला द्या, रस्ता नाही-टोल नाही’अशा घोषणा देत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. ‘खड्डयांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच’असा इशारा आ. पृथ्वीराज चव्हाण,डॉ. विश्वजीत कदम व पृथ्वीराज पाटील यांनी दिला. स. १० वाजल्यापासून नेते व कार्यकर्ते आंदोलनात ठाण मांडून होते.आमदार सतेज पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते परंतु ते दाद देत नव्हते. पृथ्वीराज पाटील आणि सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करुन महामार्गावर रास्तारोको केले. यावेळी पोलिसांना पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करुन तळबीड पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान दुपारी दोन वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंदरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील, टोल नाक्याच्या २० किमी परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असे सांगून टोलमध्ये २५ %माफी जाहीर केली व आणखी २५% माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
"रस्ते खराब आहेत तर टोल वसुली कशासाठी ? असा सवाल करुन टोल वसुली रद्द झालीच पाहिजे असा इशाराही काँग्रेसने दिला. वाहनाधरकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत सांगली काँग्रेसने सरकारविरोधात निदर्शने केली. तासवडे टोल नाका येथे सकाळी नऊ वाजल्यापासूनच पृथ्वीराज पाटील व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी दाखल झाले. काँग्रेसचा झेंडा हाती घेत व घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. बराच वेळ टोल आकारणी बंद पाडण्यात आली. ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो, टोल वसुली रद्द झाली पाहिजे, रस्ता आमच्या हक्काचा-नाही कोणाच्या बापाचा’अशा घोषणा देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर आंदोलन केले. रस्त्यावरच ठिय्या मारला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.पोलिसी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते.
‘‘रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त, खड्डयांनी रस्ता भरला सामदाम –प्रवाशांच्या माथी ट्रॅफिक जाम, रस्त्यांची दुर्दशा मग टोल हवाच कशासाठी ?” या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले. आंदोलनात सचिन कदम, शशांक पाटील, बिपीन कदम, सनी धोतरे, डी. पी. बनसोडे, विजय आवळे, प्रतीक्षा काळे, भारती भगत, सीमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी, संतोष भोसले, मौला वंटमुरे, राजू पाटील, प्रशांत देशमुख, महावीर पाटील, प्रशांत अहिवळे, आयुब निशाणदार, आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.