| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑगस्ट २०२४
सध्या राज्यात बाल अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी आपल्याला जर बालकामगार, बालभिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त किंवा हरवलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक ती मदत कोठून व कशी मिळवून देता येईल ? यासाठी कोठे संपर्क करावा याबाबत नागरिकात संभ्रम असतो. पोलिसात गेल्यानंतर तेथे दाद घेतली जाणार का ? अशी शंका असते. त्यामुळे केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार महिला व बाल विकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शून्य ते अठरा वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या केव्हा संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी 1098 ही टोल फ्री चाईल्ड हेल्पलाइन सेवा सुरू केली असून, 24 तास यावर कधीही संपर्क साधता येऊ शकतो. विशेष म्हणजे संकटग्रस्त बालक स्वतःही या सेवेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.