| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वात प्रथम सांगलीत मतभेदाची ठिणगी पडली होती, ज्याचा नंतर वणवा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाविकास आघाडीने याच सांगली जिल्ह्याचा फॉर्म्युला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वप्रथम नक्की केला आहे. इतर ठिकाणच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी माहिती, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून लोकसभा निवडणुकीत मिठाचा खडा पडला होता. परंतु कालच आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून मतभेदाची ही दरी सांधली आहे, त्यामुळे आता सांगली आमच्यासाठी चांगली आहे.
सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तीन जागा लढण्यावर महाविकास आघाडी नेत्यांचे एकमत झाले असून, त्यानुसार सांगली, पलूस-कडेगाव व जत या ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देईल. तर वाळवा, शिराळा आणि तासगाव कवठे महांकाळ या जागेवर राष्ट्रवादी आपले उमेदवार देईल. तर मिरज आणि खानापूर-आटपाडी मधून शिवसेना उमेदवार उभा करणार आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
संभाव्य उमेदवाराबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उमेदवारी बाबत प्राथमिक चर्चा झाली असून त्यानुसार, पलूस-कडेगाव मध्ये विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम, जत येथे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत, तर सांगली येथून पृथ्वीराज पाटील हे आमचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शिराळा येथून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, वाळवा येथून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तासगाव-कवठेमंकाळ मधून रोहित पाटील यांची नावे नक्की करण्यात आली आहेत. तर शिवसेना तर्फे खानापूर आटपाडी मधून चंद्रहार पाटील आणि मिरजेतून सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी मिळू शकते.
सांगली जिल्ह्यात आठही मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्राबल्य असून, महायुती बाबत असलेल्या जनतेतील नाराजीचा फायदा आम्हाला होणार आहे, असे सांगून वडेट्टीवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाची गुढी आम्ही सांगली जिल्ह्यातूनच उभारु, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.