| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात काही ठिकाणचे अपवाद वगळता अतिशय उत्कृष्ट पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आटपाडी व जत तालुक्यातील काही भाग मात्र कोरडाच राहिलेला आहे. जुलै महिन्यातील पावसाचा विचार करता तब्बल २०९ टक्के म्हणजे 283 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस 82% ने अधिक आहे.
गतवर्षी जून आणि जुलै या सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम ही वाया गेला. परंतु यंदा जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने उत्तम हजेरी लावली आहे. जून महिन्यात 226 मिलिमीटर तर जुलै महिन्यात 283 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिराळा, कडेगाव, पलूस, मिरज, तासगाव, वाळवा, आणि खानापूर या सात तालुक्यात जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर संततदार पाऊस सुरू आहे. दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, कवठेमंकाळ, मिरज (पूर्व भागात) या तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी राज्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील पावसाचा विचार करता कृष्णा- वारणा नदी काठमात्र धास्तावलेला आहे. या दोन्ही नदीकाठच्या शेतकऱ्यांचे महापुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी पिके महापुरात आडवी झाल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील पावसापासून वंचित असलेला, किंवा वारणा- कृष्णा नदीकाठचा महापुराने पिकाचे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून, तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.