| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
बऱ्याच वर्षानंतर सांगली महापालिकेला आयएसआय दर्जाचा एक चांगला अधिकारी आयुक्त म्हणून लाभला आहे. शुभम गुप्ता यांनी दिलेल्या परीक्षेत सहाव्या रँकने यश प्राप्त केले आहे. त्यांच्यात निश्चितच चांगले गुण आहेत, असे सांगून आपण आयुक्त शुभम गुप्ता यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे प्रतिपादन खा. विशाल पाटील यांनी केले आहे.
काल झालेल्या महाआघाडीतील वादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. विशाल पाटील म्हणाले की, सांगली महापालिकेत भाजपासह ठेकेदारांची लॉबी त्यांचे दुकान बंद झाल्यामुळे आयुक्तांच्या विरोधात उभी राहिली आहे. परंतु त्यामुळे एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आपण यशस्वी होऊ देणार नाही, असे खा. विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की, शासनामार्फत शुभम गुप्ता यांच्याबाबत जो अहवाल तयार करण्यात आला आहे, तो आपण संपूर्णपणे, काळजीपूर्वक वाचला आहे. यामध्ये कुठेही शुभम गुप्ता यांच्यावर लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष आरोप केलेला नाही. संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांनी, तेथील अधिकाऱ्याबाबत आरोप केला आहे. परंतु त्यामध्येही शुभम गुप्ता यांचे प्रत्यक्ष नाव नाही. मात्र जर शुभम गुप्ता शासनाच्या चौकशीत दोषी आढळले, तर त्यांना हटवण्याची पहिली मागणी आपण करू, असे खा. विशाल पाटील यांनी म्हटले आहे.