Sangli Samachar

The Janshakti News

महापालिका स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात, शिवाजी मंडई परिसरातील व्यापारी ड्रेनेज पाण्यात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
शिवाजी मंडई परिसर हा नेहमीच मुसळधार पावसात गुडघाभर पाण्यात वेढला जातो. येथील पाणी तुंबल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होतेच, परंतु वाहनधारक आणि येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो.

वास्तविक शिवाजी पुतळ्याच्या पश्चिमेकडील बाजूपासून ते आनंद थिएटरपर्यंत ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यात आली असून ती तुंबणाऱ्या पाण्याला वाहून नेण्यास सक्षम आहे. परंतु शिवाजी मंडई पोस्ट ऑफिस जवळील ड्रेनेज पाईप लाईन छोटी असल्यामुळे, ती वारंवार तुंबली जाते. परिणामी थोडा जरी मोठा पाऊस झाला तर येथे गुडघाभर पाणी साचून राहते.

काल 15 ऑगस्ट रोजी झालेल्या मोठ्या पावसात, शिवाजी मंडईजवळ असेच ड्रेनेजच्या पाण्याचे तळे साचून राहिले. परिणामी येथील हातावरील पोट असलेल्या व्यापाऱ्यांना हे पाणी निचरा होण्याची प्रतिक्षा करीत, सकाळी जवळजवळ अकरा वाजेपर्यंत थांबावे लागले. सकाळच्या व्यापाराचा बराचसा वेळ वाया गेल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना नुकसान व मनस्ताप सहन करावा लागला.

ड्रेनेजच्या पाण्याने व्यापारी बेहाल


आणि म्हणूनच तिथे तुंबणारी ड्रेनेजची छोटी पाईपलाईन बदलून, योग्य प्रमाणातील पाईपलाईन टाकावी व येथील तुंबणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे या भागातील गोरगरीब व्यापाऱ्यांची मागणी आहे. महापालिकेचे विद्यमान आयुक्त हे लोकाभिमुख कारभार करण्यात सुप्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती करण्यात येत आहे.