| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० ऑगस्ट २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरून भाजपामधील एक मोठा गट आणि संघ परिवार नाराज असल्याने, तसेच भाजपनेच मध्यंतरी घेतलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 'बिकट वाट ही सत्तेची !' असा सर्व्हे आल्याने सध्या महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री भाजपचे चाणक्य अमित शाह हे तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
भाजप आणि संघ परिवारांमधील दूरी कमी करणे, अजित पवारांच्या वरून पेटलेले वातावरण निवळणे यासाठी अमित शाह हे या दौऱ्यात खास प्रयत्न करणार असून, त्या दृष्टीने संघाचे व भाजपाचे राज्यातील अनेक वरिष्ठ नेते यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात अमित शाह हे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार आहेत.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून बसायचं का ? असा सवाल संघ परिवार आणि भाजपामधील एक मोठा गट करीत आहेत. तशात लोकसभा निवडणुकीला जो मोठा फटका भाजपला बसला त्याला ही अभद्र युतीच कारणीभूत असल्याचे उघड मत व्यक्त करण्यात येत आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. परंतु वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्यात आला मात्र आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच चूक करणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
परंतु विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आग्रही आहेत. कथितरित्या लोकसभेला नुकसान झाले असले तरी अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीला मोठे साथ मिळणार असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे. आता अमित शाह यातून कसा तोडगा काढतात ? आणि विधानसभेची रणनीती कशी आखली जाते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. मात्र यावेळी भाजपामध्ये मोठे उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.