yuva MAharashtra चिट फंडात फसलेल्या गुंतवणूकदारांसाठी ईडी घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, मोदींची महत्त्वपूर्ण भूमिका ?

चिट फंडात फसलेल्या गुंतवणूकदारांसाठी ईडी घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, मोदींची महत्त्वपूर्ण भूमिका ?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील घोटाळे आणि घोटाळे करणाऱ्यांकडून जप्त केलेला पैसा पिडीतांना देणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर चीट फंड, लॉटरी अशा योजनांमध्ये पैसे गमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोलकत्याच्या रोज व्हॅली ग्रुपच्या कंपन्यांमध्ये जमा केलेल्या बावीस लाख पीडितांमध्ये ईडीने जप्त केलेली बारा कोटी रुपयांची रक्कम वाटप करणार आहे.

याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पी एम एल ए न्यायालयाने नुकतीच कोलकत्ता येथील ईडीला रोज व्हॅली घोटाळ्यातील जप्त केलेली 11. 99 कोटी रुपयांचे रक्कम ऍसेट डिस्पोजल कमिटीकडे हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यानुसार इ डी आता न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे.


पश्चिम बंगालमध्ये २०१३ मध्ये झालेला रोझ व्हॅली घोटाळा हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. हा घोटाळा शारदा घोटाळ्यापेक्षाही मोठा होता, ईडीने दिलेल्या माहितीनुसार, भारतभरातील गुंतवणूकदारांकडून १७,५२० कोटी रुपये गोळा केले असून ऑल इंडिया स्मॉल डिपॉझिटर्स युनियनने ही रक्कम ४०,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काही अहवालांमध्ये ही रक्कम ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. रोझ व्हॅली घोटाळा प्रकरणी ईडी आणि बाजार नियामक सेबीही कारवाई करत आहे. या कंपनीने बेकायदेशीर योजनांद्वारे जनतेकडून जमा केलेला पैसा वसूल करण्यासाठी सेबी कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करत आहे.