Sangli Samachar

The Janshakti News

वीराचार्य पतसंस्थेस प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
येथील प्रथितयश वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दिपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे संपन्न झाला.

यावेळी सहकार क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी असलेल्या कॉसमॉस बँकेचे चेअरमन मा. मिर्लीद काळेसो यांचे हस्ते फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे यांचे अध्यक्षतेखाली फेडरेशनचे महासचिव मा. शशिकांत राजोबा, गोदावरी अर्बनचे चेअरमन सौ. राजश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे चेअरमन श्री. एन. जे. पाटील, व्हा. चेअरमन श्री. मनोज भिलवडे यांनी व व्यवस्थापक शितल मसुटगे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

 फेडरेशनच्यावतीने राज्यातील पतसंस्थांचे मुल्यांकन, गुणांकन करून हा पुरस्कार दिला जातो. पुणे विभागातून १०० ते ५०० कोटी ठेवी असणाऱ्या संस्था गटामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार संस्थेस प्राप्त झाला आहे. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षामध्ये संस्थेची सेवा, ग्राहकाभिमुख व्यवहार यामुळे संस्थेस सर्व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. संस्थेच्या ठेवी ४०५ कोटी, व कर्जे २९३ कोटी वितरीत झाली असून कर्ज वसूली ९७.५०% होण्यास मदत झाली आहे. संस्था एकूण १००० कोटी व्यवसायाकडे गतीने मार्गक्रमण करीत आहे. अनेक अडचणीच्या पार्श्वभुमीवर कर्जदार सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळे वसुली सक्षम रीत्या होवून शुन्य टक्के एन पी ए ची परंपरा कायम राखण्यात संस्थेस यश आले आहे.

सांगली जिल्हा कार्यक्षेत्र घेवून २५ शाखांच्या माध्यमातून विधायक अर्थकारणासह सजग समाजकारण करण्यात संस्था यशस्वी ठरत आहे. जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील व्यावसायिकांना सक्षम बनण्यासाठी, त्यांच्या व्यवसायात हातभार लागावा म्हणून या संस्थेने स्थापनेपासूनच लोकाभिमुख स्वच्छ कारभार केल्यामुळे संस्थेवर कायम एक दिलाचे, एक विचाराचे संचालक मंडळ निवडून येत असते. स्थापनेपासूनच सातत्याने 'अ' वर्ग मिळवल्याने ठेवीदारांचा या पतसंस्थेवर असलेला विश्वास वाढत्या ठेवीतून दिसून येत आहे. या पुरस्कारामुळे संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.