| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ३१ ऑगस्ट २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभव हा जातीपातीच्या राजकारणामुळे आणि ज्यांना यापूर्वी सहकार्य केले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्याची टीका माजी खासदार श्री. संजय काका पाटील यांनी केली आहे. त्यांचा रोख विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे होता. तासगाव येथील दत्त माळावर आयोजित केलेल्या प्रभोदय दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. संजय पाटील म्हणाले की, एका पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते. दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका येत आहेत, यावेळी आपण आपली ताकद दाखवायची असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमात तालुक्यातील गोविंदा पथकांनी लाखोंची बक्षिसे मिळवली आहेत. त्यांचे कौतुक करावयास हवे.
आपल्या भाषणात श्री. संजय पाटील म्हणाले की, काहींना मोठे बोलण्याची सवय असते. आपण खासदार असताना जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली. पाणी, रस्ता, रेल्वेचे प्रश्न सोडविले. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या. हे केवळ करू शकलो ते लोकांचे आशीर्वाद होते म्हणूनच. तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देण्याचे आवाहन करून, श्री. संजय पाटील यांनी गतिमान विकास करण्याची अपेक्षा बोलून दाखवली.