| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १८ ऑगस्ट २०२४
माझ्या एका मित्राने नुकतेच एक चित्र मला व्हॉट्सॲपवर पाठवले आहे. या चित्रामध्ये एका माणसाचा चेहरा दाखविला आहे आणि या माणसाच्या डोक्यात असलेली जळमटे, कोळीकोष्टके, जाळ्या दुसरी एक व्यक्ति साफ करत आहे. या चित्रावर दोन वाक्ये आहेत. Most Difficult Cleaning and Let’s attempt this Diwali म्हणजे सर्वात कठीण साफसफाई, आणि या सणासुदीला हे करू या.
असे हे चित्र पाहून आणि त्यावरील वाक्ये वाचून पूर्वी कधीतरी मी वाचलेली एक बोध कथा मला आठवली.
गावा बाहेरील जंगलामध्ये एक साधू महात्मा राहात होते. गावातील लोक आपल्या अडीअडचणी, समस्या, दुःख निवारण्यासाठी त्यांच्याकडे सल्ला विचारायला येत. एके दिवशी दोन मित्र या साधुकडे आले आणि साधूला नमस्कार करून त्यांनी बोलायला सुरूवात केली.
“महाराज, आजवर आमच्यावर अनेक संकटे कोसळली आहेत. या संकटामुळे आम्हाला जगणे कठीण झाले आहे. आम्ही खुप दुःखी आहोत. या जगाचा, संसाराचा आम्हाला वीट आला आहे. या संसारातून, दुःखातून आता आम्हाला मुक्ती हवी आहे. कृपया आम्हाला मुक्ती द्या.“
“ ठिक आहे. तुमच्या दुःखातून मी तूम्हाला मुक्ती देईन पण, त्या आधी दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी आजवर तुम्ही काय केले आहे, कांही साधना केली आहे कां?“ साधु महाराजांनी विचारले.
“महाराज, या बाबत मी अगदी अडाणी, अज्ञानी आहे. मुक्ती मिळण्यासाठी आजवर मी कोणतीही साधना किंवा अन्य कांही केले नाही.“
एक मित्र म्हणाला. तेव्हा साधू महाराजांनी म्हटले,
“आजवर तूम्ही कोणतीही साधना केली नाही, उपाय केले नाहीत. त्यामुळे मुक्ति मिळण्यासाठी तुम्हाला माझ्या सोबत या जंगलात १२ महिने राहावे लागेल. त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या दुःखातून मुक्ति देईन.“
आता तो दुसरा मित्र साधुला सांगू लागला, “महाराज, संसाराचा मोह त्याग करण्यासाठी आणि दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी मी आजवर खूप साधना केली आहे. पहाटे लवकर उठून धर्मग्रंथ-मंत्र पठण केले आहे. कितीतरी दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला आहे. भजन-किर्तन केले आहे. अनेक प्रकारची कर्मे व उपासना केली आहे. सत्संगाला हजेरी लावली आहे. तीर्थयात्रा केल्या आहेत. व्रत वैकेल्ये केली आहेत. दान-धर्म केले आहे. नैतिकतेचे पालन करत ज्याला-ज्याला पुण्य म्हणता येईल ते सर्व कांही मी संसाराचा मोह टाळण्यासाठी आणि दुःखातून सुटका मिळून मुक्ती मिळण्यासाठी केले केले आहे. त्यामुळे तूम्ही मला आता मुक्ती द्या.“
“ तुमच्या दुःकातून मी तुम्हालाही मुक्ती देईन पण, त्यासाठी तुम्हालाही माझ्या सोबत या जंगलात १२ वर्षे राहावे लागेल. १२ वर्षांनंतर मी तुम्हाला मुक्ती देईन.“ साधुने दुस-या मित्राला सांगितले.
“१२ वर्षे ? साधू महाराज कांही चूक तर होत नाही ना? माझ्या या मित्राने कांहीही साधना केली नाही, कांही अध्ययन केले नाही त्याला तूम्ही १२ महिन्यानंतर मुक्ती देणार आहात आणि मी खूप साधना केली आहे, अध्ययन केले आहे, वेगवेगळे कर्मे केली आहेत, तरीही तुम्ही मला मात्र १२ वर्षांनंतर दुखातून मुक्ती देतो असे म्हणता, हे कसे योग्य आहे?“ दुसऱ्या मित्राने विचारले.
“सांगतो. मुक्ती मिळवण्याच्या उद्देशाने तुम्ही आजवर खूप कांही काथ्याकुट केला आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात चांगल्या, वाईट, योग्य-अयोग्य विचारांची इतकी गर्दी झाली आहे की त्यात नवीन विचार येण्यास आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे तुमच्या मस्तकात साठलेले अयोग्य, वाईट विचारांना काढून टाकून, विचारांची शुद्धी केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळु शकत नाही. आणि ही सर्व साफ-सफाई करण्यासाठी मला १२ वर्ष लागतील. अयोग्य विचारांचा पालापाचोळा, तण, काटे-कुटे काढून तुमचे विचार मुक्ती मिळण्यास योग्य झाले, परिपक्व झाले की तुमच्या दुःखातून मी तूम्हाला मुक्ती देऊ शकेन.“ साधुने मित्राला सांगितले.
माझ्या मित्राने व्हॉट्सॲपवर पाठवलेले चित्र पाहून मला आठवलेली कथा इथे संपली.
आणि माझ्या मनातील एका कोपऱ्यातून आवाज आला,
“राजा, जीवनामध्ये तुलाही दुःख नको आहे. दुःखातून मुक्ती मिळून आपले जीवन आनंदी, सुखी व्हावे असे तुझी इच्छा आहे. आपल्या या इच्छेपूर्तीसाठी आजवर तू खूप कांही केले आहेस, करत आहेस आणि पुढेही करणार आहेस. पण, त्यापूर्वी तुझ्या मस्तकात जमलेली अयोग्य, वाईट विचारांची जळमटे, कोळीकोष्टके काढून टाकणे आवश्यक आहे असे तुलाही वाटत नाही कां ?“
मी विचारात पडलो. देव जात-पात, धर्म, वर्ण, कातडीचा रंग, शरीराचे बाह्य रूप, श्रीमंती, गरीबी, यश-अपयश, न्याय-अन्याय, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, देव-दानव-राक्षस, जन्म, मूत्यू, साधना, मुक्ती, सवयी, कर्त्यव्ये, जबाबदारी .... अनेक विषय, व माझ्या मनातील विचार. मला समजुन चुकले मनातून अयोग्य-वाईट विचार काढणे Most Difficult Cleaning, महाकठीण साफसफाई आहे. पण चित्रातील Let’s attempt this Diwali दिवाळीपासून याची सुरवात करूया या संदेशाची मला आठवण झाली आणि त्याचे पालन करण्याचे मी मनोमन ठरवले.
- आजचे बोल अंतरंगाचे इथे पूर्ण