yuva MAharashtra डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगली-मिरज विधानसभा मतदारसंघातील निर्णयाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांकडे टोलवला !

डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगली-मिरज विधानसभा मतदारसंघातील निर्णयाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांकडे टोलवला !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीतर्फे जोरदार तयारी करण्यात येत आहे. महायुतीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी, सर्वांनी एकमताने व पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला आहे. यासाठी महाविकास आघाडीचे पहिली बैठक नवी दिल्ली तर त्यानंतर पाठोपाठ मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी 'जिथे ज्यांची ताकद तिथे त्यांचा उमेदवार' या मुद्द्यावर एकमताने उमेदवार देण्याचे ठरले आहे. परंतु जेथे जागेबाबत वा उमेदवारीबाबत वादाचा विषय आहे, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी एकत्रित बसून सोडवण्याचा निर्णय घेण्यात आहे.

अशा टोकाचे मतभेद असलेल्या मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सांगली व मिरज हा मतदारसंघ केंद्रस्थानी आहे. विशेषतः सांगली लोक विधानसभा मतदारसंघात टोकाचा संघर्ष पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे काँग्रेस नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी, सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय, केंद्र व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते घेतील, असे सांगून हा वादाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात टोलवला आहे. सांगली जिल्ह्याचे दिवंगत नेते, माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळाच्या अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विश्वजीत कदम यांना पत्रकारांनी सांगलीच्या जागेवरून छेडले असता, त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद लावली होती आणि त्यांच्या विजयाचे विमान दिल्लीच्या तख्तावर लँड केले होते. त्यामुळे आता सांगली व मिरज विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. विश्वजीत कदम यांनी स्पष्ट भूमिका घेऊन कोणा एकाच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यातून होत होती. परंतु राजकारणात मुरब्बी ठरत असलेल्या डॉ. विश्वजीत कदम यांनी हा वादाचा विषय केंद्र व राज्य नेतृत्वाकडे सोपवून, तूर्तास आपले अंग काढून घेतले आहे.

त्यामुळे आता सांगली व मिरज मतदार संघातील संभाव्य उमेदवाराबाबत डॉ. विश्वजीत कदम यांची भूमिका तूर्तास तरी अंधारात राहिली आहे. परंतु काही दिवसापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपण पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे संकेत दिले होते. मात्र श्रीमती जयश्रीताई पाटील या, ज्या आक्रमकतेने विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत, त्यावरून काँग्रेसमध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बंडखोरीची राळ उठणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. 

सांगली प्रमाणेच मिरज विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. तेथेही प्रमाणेच बंडखोरी होणार का ? आणि ही बंडखोरी राज्य व केंद्र पातळीवरील काँग्रेस नेते कशी थोपवणार सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.